

दुबई : भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाने अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात दणक्यात केली आहे. यजमान संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाला २३४ धावांनी मात देत टीम इंडियाने मोठा विजय नोंदवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने केवळ ९५ चेंडूंमध्ये १७१ धावांची वादळी खेळी करत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले.
सामन्यात प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी यूएईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. या धुलाईची सुरुवात केली ती वैभव सूर्यवंशीने. त्याने ९५ चेंडूत १७१ धावांची अविश्वसनीय खेळी केली, ज्यात त्याने १४ उत्तुंग षटकार आणि ९ चौकार लगावले. यासह एका U-19 च्या वनडे डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवीन विश्वविक्रम वैभवच्या नावावर जमा झाला. त्याने केवळ ३० चेंडूंमध्ये अर्धशतक आणि त्यानंतर ५६ चेंडूंमध्ये आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले. त्याने आरोन जॉर्ज (६९ धावा) सोबत दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची मोठी भागीदारी रचली.
वैभव सूर्यवंशीने केलेली १७१ धावांची खेळी, U-19 वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाने केलेली अंबाती रायुडूच्या नाबाद १७७ धावांच्या (२००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध) विक्रमानंतरची दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला विहान मल्होत्रा (५५ चेंडूंत ६९ धावा) आणि आरोन जॉर्ज (७३ चेंडूंत ६९ धावा) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीची जोड मिळाली. परिणामी, भारताने ५० षटकांत ६ गडी गमावून ४३३ धावांचा विक्रमी स्कोअर उभा केला. हा स्कोअर U-19 वनडे क्रिकेटमधील भारताचा आजपर्यंतचा सर्वाधिक स्कोअर ठरला आहे. तसेच, हा आशिया चषक इतिहासातील सर्वोच्च स्कोअर बनला आहे. मधल्या फळीत वेदांत त्रिवेदी (३८), अभिज्ञान कुंडू (नाबाद ३२) आणि कनिष्क चौहान (नाबाद २८) यांनीही धावांचा ओघ कायम राखला.
४३४ धावांचा पाठलाग करताना यजमान यूएईचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. त्यांचे ६ गडी केवळ ५३ धावांवर गारद झाले होते. यानंतर पृथ्वी मधु (५०) आणि उद्धिश सूरी (नाबाद ७८) यांनी सातव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न केवळ पराभवाचे अंतर कमी करण्यासाठी पुरेसे ठरले. निर्धारित ५० षटकांत यूएईचा संघ ७ बाद १९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने UAE वर तब्बल २३४ धावांनी दणदणीत विजय मिळवून आपले आशिया चषकातील इरादे स्पष्ट केले आहेत.