

IND vs SA 3rd T20 Big Changes in India Squad as shubman gill dropped
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सध्या अतिशय चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे. यामुळे आता उभय संघांचे लक्ष्य १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथील निसर्गरम मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यावर लागले आहे, जिथे मालिका आपल्या बाजूने झुकवण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत.
या निर्णायक लढतीआधीच, दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार दोन्ही बाजूला काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे, विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव संघात दोन मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
न्यू चंदीगड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शुभमन गिल खातेही उघडू शकला नाही, तो शून्यावर बाद झाला. त्याआधी, कटकमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फक्त चार धावा करू शकला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावा काढण्यात असमर्थ ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी पुन्हा एकदा सॅमसनला संधी मिळू शकते.
दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत सपशेल अपयशी ठरलेल्या शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची संघात 'एन्ट्री' होऊ शकते.
युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याच्याऐवजी, हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही बदल भारतासाठी नवे समीकरण जुळवण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाची धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आत्मविश्वासपूर्ण असेल, तरीही मालिका जिंकण्यासाठी ते आपल्या संघात तीन मोठे बदल करू शकतात. अनुभवी खेळाडूंना संधी देऊन ते आपली बाजू अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
जॉर्ज लिंडेच्या जागी अनुभवी फिरकीपटू केशव महाराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. गोलंदाज सिपामला याच्याऐवजी आपल्या भेदक वेगासाठी ओळखला जाणारा एन्रिक नॉर्टजे संघात परतण्याची शक्यता आहे. तर बार्टमनच्याऐवजी युवा खेळाडू कार्बिन बॉस यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डिकॉक, एडन मार्करम (कर्णधार), डिवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डेनोवन फरेरा, केशव महाराज, मार्को यान्सन, एन्रिक नॉर्टजे, कार्बिन बॉस, लुंगी एन्गीडी.
आता सर्वांचे लक्ष धर्मशालाच्या मैदानाकडे लागले आहे. ही लढत केवळ तिसरा टी-२० सामना नसून, दोन्ही संघांसाठी मालिकेतील आघाडी घेण्याचा एक सुवर्ण संधी आहे. भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर आफ्रिकेचा संघ आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी सज्ज असेल. कोण बाजी मारणार आणि मालिकेत निर्णायक आघाडी घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.