

ICC Men's T20 World Cup 2026 Tickets
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि खिशाला परवडणारी बातमी आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) स्पर्धेच्या तिकिटांची विक्री आज, ११ डिसेंबर पासून सुरू झाली आहे. सर्वात मोठी आणि आकर्षक गोष्ट म्हणजे, या विश्वचषकाचे तिकीट भारतात केवळ १०० रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. यामुळे क्रिकेटचा हा महाकुंभमेळा सामान्य चाहत्यांसाठीही सुलभ झाला आहे.
टी-२० विश्वचषकाच्या १०व्या हंगामाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हा मोठा इव्हेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिकिटांच्या किमती अत्यंत कमी ठेवल्या आहेत. भारतामध्ये काही ठिकाणच्या सामन्यांसाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत फक्त १०० रुपये आहे. तसेच श्रीलंकेमध्येही तिकिटांची सुरुवात १,००० LKR (सुमारे २९५ भारतीय रुपये) पासून होत आहे.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी सांगितले की, ‘पार्श्वभूमी, भौगोलिक स्थान किंवा आर्थिक स्थितीची पर्वा न करता, प्रत्येक चाहत्याला विश्वस्तरीय क्रिकेटचा स्टेडियममध्ये अनुभव घेण्याची संधी मिळावी, हे आमचे ध्येय आहे.’
अगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात एकूण २० संघ सहभागी होणार असून आणि ५५ सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये ग्रुप स्टेज, सुपर ८ आणि नॉकआऊट सामने असतील. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
ईडन गार्डन्स, कोलकाता
वानखेडे स्टेडियम, मुंबई
आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
एसएससी क्रिकेट ग्राउंड, कोलंबो
पल्लेकेले क्रिकेट स्टेडियम, कॅंडी
तिकिटांची विक्री भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी ६:४५ वाजल्यापासून सुरू झाली आहे. चाहते घरबसल्या सहज तिकीट बुक करू शकतात.
तुम्ही अधिकृत क्रिकेट विश्वचषक वेबसाइट (https://tickets.cricketworldcup.com) ला भेट देऊ शकता. किंवा, थेट BookMyShow वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन तिकीट बुक करू शकता.
वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला सहभागी संघांचे फ्लेग दिसतील. तुम्हाला ज्या संघाचे सामने पाहायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
उदाहरणार्थ, तुम्ही टीम इंडिया वर क्लिक केल्यास त्यांच्या सामन्यांची यादी समोर येईल.
तुम्हाला हवा असलेला सामना निवडा (उदा. भारत विरुद्ध पाकिस्तान). लॉगिन करा आणि 'बुक नाऊ' पर्याय निवडा. तुमची आसन व्यवस्था निवडा आणि ऑनलाइन पेमेंट करून तिकीट बुक करा.
एका लॉगिन आयडीवरून जास्तीत जास्त २ तिकिटे बुक करता येतील.
क्रिकेट चाहत्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचक सामना १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्याची तिकिटे श्रीलंकेत १,५०० LKR (सुमारे ४३८ भारतीय रुपये) पासून उपलब्ध आहेत.
पहिल्याच दिवशी, ११ डिसेंबरला कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि मुंबईत भारत विरुद्ध अमेरिका असे तीन सामने होणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, ‘फक्त १०० रुपयांपासून तिकीट सुरू होत असल्याने टी२० विश्वचषक २०२६ बद्दलचा उत्साह अनेक पटीने वाढला आहे.’