Travis Head IPL 2027: देशासाठी ट्रेविस हेडने सोडले 14 कोटी रुपये; IPL मधून अचानक माघार का घेतली? कारण ऐकून व्हाल थक्क

Travis Head IPL 2027: सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेड आयपीएल 2027 मध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Travis Head
Travis Head Pudhari
Published on: 
Updated on: 

Travis Head IPL 2027: आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आक्रमक सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड पुढील हंगामात खेळताना दिसणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक आणि कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन हेडने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे त्याला तब्बल 14 कोटी रुपयांच्या करारावर पाणी सोडावे लागणार आहे.

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा ही सनरायझर्स हैदराबादची सलामीची जोडी आयपीएलमधील सर्वात आक्रमक जोड्यांपैकी एक मानली जाते. या दोघांनी मैदानावर अनेकदा गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये ही जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार नाही.

ट्रेविस हेड आयपीएल 2027 मध्ये का खेळणार नाही?

ट्रेविस हेडने कामाचा वाढता ताण आणि ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या मालिकांचा विचार करून आयपीएल 2027 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, हेडने आपल्या निर्णयाची माहिती सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाला दिली आहे.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी हेडने आयपीएलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाचा सनरायझर्स हैदराबादला आर्थिक फायदा होणार आहे. हेडला संघाने 14 कोटी रुपयांच्या करारावर कायम ठेवले होते. मात्र, आता मिनी लिलावापूर्वी संघाच्या पर्समध्ये 14 कोटी रुपयांची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या मिनी लिलावात हैदराबादकडे मोठी रक्कम खर्च करण्याची संधी असेल.

ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या मालिकांमुळे घेतला निर्णय

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिका खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत खेळण्याची शक्यता आहे. ही अंतिम फेरी आयपीएलनंतर होणार आहे.

यानंतर ऑस्ट्रेलियासमोर अ‍ॅशेस मालिकेचे आव्हान असेल. तसेच वनडे विश्वचषकही येणार आहे. या सर्व स्पर्धांचा विचार करता हेडसाठी फिटनेस आणि विश्रांती महत्त्वाची आहे. त्यामुळे देशासाठी खेळण्याला प्राधान्य देत त्याने आयपीएलमधून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

Travis Head
Rajat Patidar SMAT 2026: 13 षटकार आणि 8 चौकार! रजत पाटीदारची ऐतिहासिक खेळी; 48 चेंडूंत ठोकल्या नाबाद 135 धावा

आयपीएलमध्ये ट्रेविस हेडची कामगिरी कशी राहिली?

ट्रेविस हेडने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी हैदराबादने त्याला 6.8 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर त्याच्या दमदार कामगिरीमुळे फ्रँचायझीने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला 14 कोटी रुपये दिले.

हेडने सनरायझर्स हैदराबादकडून तीन हंगामांत एकूण 43 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने 1,300 हून अधिक धावा केल्या. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे हैदराबादच्या संघाला अनेक सामन्यांमध्ये वेगवान सुरुवात मिळाली.

हैदराबादमध्ये येण्यापूर्वी हेड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) भाग होता. आरसीबीकडून खेळताना त्याने एका हंगामात सात सामने खेळले आणि 151 धावा केल्या.

Travis Head
Kapil Dev on Virat Kohli: '10 वर्षांनंतर विराट कोहलीला पश्चात्ताप होईल'; कपिल देव यांच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हणाले?

अभिषेक शर्मा-ट्रेविस हेडची जोडी आता दिसणार नाही

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. डावाच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव निर्माण करणे हे या जोडीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यामुळे हेडच्या अनुपस्थितीत अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण उतरणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेडच्या निर्णयामुळे हैदराबादला एका बाजूला मोठा आर्थिक फायदा झाला असला, तरी त्याची जागा भरून काढणे सोपे नाही. आता 14 कोटी रुपयांच्या उपलब्ध रकमेतून हैदराबाद कोणत्या खेळाडूला संघात घेणार आणि हेडच्या जागी कोणाला संधी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.