

मुंबई : आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात काही संघांचा दबदबा स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे. यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची मजबूत फलंदाजीची रचना. याच कारणामुळे काही संघ सहजपणे 200 पेक्षा जास्त धावांचा स्कोर करताना दिसले आहेत. तसेच त्यांनी लक्ष्याचा यशस्वी पाठलागही केला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या संघांबद्दल माहिती जाणून घेऊया.
या यादीत पहिल्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नाव आहे. आयपीएल 2025 चा हंगाम या संघासाठी चांगला गेलेला नाही. असे असले तरी या टी-20 लीगमध्ये सीएसकेने नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 33 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम गाठण्यात यशस्वी ठरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यादीत दुस-यास्थानी आहे. त्यांची फलंदाजी लाइनअप आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात प्रभावी राहिली आहे. आरसीबी संघाने आयपीएलच्या इतिहासात 32 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्स संघ आता या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी पंजाब किंग्ज आणि केकेआरला मागे टाकले आहे. एमआयने आतापर्यंत 29 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर पंजाब किंग्ज संघ आहे. प्रीती झिंटाच्या या संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली तरी त्यांच्या संघाची फलंदाजी प्रत्येक हंगामात उत्कृष्ट राहिली आहे. पंजाब किंग्जने आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पंजाब किंग्जसह या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. केकेआरने तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि 28 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यश मिळवले आहे.