

मुंबई : रोहित शर्माची आयपीएल 2025 मध्ये खूप वाईट सुरुवात झाली होती, पण आता या अनुभवी खेळाडूची बॅट तळपू लागली आहे. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध हिटमॅनने 53 धावांची खेळी केली. त्याने फक्त 31 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि हे त्याचे या हंगामातील तिसरे अर्धशतक ठरले आहे. या खेळीसह रोहितने मुंबई इंडियन्ससाठी एक खास विक्रम रचला.
रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये एका संघासाठी 6000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. त्याच्यापेक्षा जास्त धावा फक्त विराट कोहलीनेच केल्या आहेत. विराटने आरसीबीसाठी 8000 हून अधिक धावा केल्या आहेत. हिटमॅनने मुंबई इंडियन्ससाठी ही अद्भुत कामगिरी केली आहे. या यादीत एमएस धोनी आणि सुरेश रैना सारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामात रोहितला पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आले नाही. पण गेल्या चार सामन्यांमध्ये या खेळाडूने तीन अर्धशतके झळकावली आहेत. या दरम्यान, त्याने नाबाद 76, 70, 12, 53 धावा वसूल केल्या. राजस्थानविरुद्ध रोहित शर्माची सुरुवात संथ झाली, होती पण सेट झाल्यानंतर त्याने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याने जोफ्रा आर्चर आणि तिक्षना यांच्याविरुद्ध आक्रमक खेळ केला. त्याने आणि रायन रिकेल्टनने पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली.
रोहित शर्मा डावाच्या दुसऱ्याच षटकात खूप भाग्यवान ठरला. फजलहक फारुकीच्या चेंडूवर पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू घोषित केले. पण रोहितने शेवटच्या सेकंदाला रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये फारुकीचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रोहित थोडक्यात बचावला. अशाप्रकारे, रोहितला एका सेकंदाच्या फरकाने रिव्ह्यूच्या जोरावर जीवनदान मिळाले आणि त्याने एक शानदार अर्धशतकी खेळी साकारली.
8871 : विराट कोहली (आरसीबी)
6008* : रोहित शर्मा (एमआय)
5934 : जेम्स व्हिन्स (हॅम्पशायर)
5528 : सुरेश रैना (सीएसके)
5269 : एमएस धोनी (सीएसके)