

Tiger Woods Arrested
फ्लोरिडा : जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्सला फ्लोरिडा कार अपघातानंतर अटक करण्यात आली आहे. १५ वेळा मेजर चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या वुड्सवर मालमत्तेचे नुकसान करणे, अपघातानंतर युरिन टेस्टला नकार दिल्याचा आरोपही असल्याची माहिती मार्टिन काउंटी शेरीफ कार्यालयाने माध्यमांना दिली.
शेरीफ जॉन बुडेन्सिएक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वुड्सच्या लँड रोव्हर गाडीने शुक्रवारी (दि.२७ मार्च) दुपारी ज्युपिटर आयलंडवर एका ट्रकला ओव्हरटेक करताना धडक दिली. त्यानंतर कार पलटी झाली. त्याच्या देहबोलीवरुन तो नशेत असावा असे जाणवत होते.
अपघातानंतर ५० वर्षीय टायगर वूड्स प्रवासी गेटच्या बाजूने रांगत बाहेर पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. मार्टिन काउंटी जेलमध्ये त्याची 'ब्रीथ अनालायझर' चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या मते वूड्सची प्रकृती अमली पदार्थ किंवा औषधांच्या प्रभावामुळे बिघडलेली असू शकते. यानंतर वूड्सने त्याची 'युरिन टेस्ट' (लघवीची चाचणी) देण्यास नकार दिला. फ्लोरिडाच्या कायद्यानुसार चाचणी नाकारणे हा स्वतंत्र गुन्हा मानला जातो.
या अपघातातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे टायगर वूड्स किंवा दुसऱ्या वाहनाच्या चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. वूड्सवर अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायदेशीर चाचणीस नकार देणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या कायद्यानुसार, वूड्सला किमान आठ तास तुरुंगात राहावे लागेल, त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टायगरच्या कारला अपघात झाल्याची घटनेच्या माहितीने मला खूप वाईट वाटले. हा एक अपघात होता, कदाचित त्यांना काही त्रास झाला असावा. ते माझे जवळचे मित्र आणि एक उत्तम व्यक्ती आहेत. वूड्सवर अशा प्रकारचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१७ मध्ये देखील ज्युपिटरमध्ये त्याला याच आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
वुड्सचा कार अपघातांशी जुना संबंध आहे. २०२१ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातातून तो थोडक्यात बचावला होता. २०१७ मध्येही तो त्याच्या मर्सिडीज कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. यावेळी करण्यात आलेल्या शारीरिक चाचणीत अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते. २००९ मध्ये घराबाहेर झालेल्या एका विचित्र अपघातानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद चव्हाट्यावर आले होते.
हा अपघात वुड्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मार्च २०२५ मध्ये झालेली दुखापत. यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर तो सावरण्याचा प्रयत्न करत होता. नुकत्याच झालेल्या 'TGL' इंडोअर लीगमध्ये तो खेळला होता आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या 'मास्टर्स' स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा मानस होता. मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या कारला अपघात झाल्याने त्याच्या पुनरागमनाच्या स्वप्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. गोल्फ समीक्षक इयान कार्टर यांनी म्हटलं आहे की, टायगर वुड्स गेल्या दोन दशकांपासून दुखापतींशी झुंज देत आहे. पुढच्या दोन आठवड्यांत होणाऱ्या मास्टर्स स्पर्धेतील सहभागासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र, पुन्हा एकदा त्याच्या कारला अपघात झाल्याने आतात्याचे पुनरागमन अशक्य वाटत आहे.