

Gautam Singhania accident
नवी दिल्ली: गुरुवारी उशिरा रात्री मालदीवमध्ये झालेल्या स्पीडबोट अपघातात रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) गौतम सिंघानिया जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघानिया यांच्यासह अनेक पर्यटक या बोटीत प्रवास करत असताना बोट उलटली. या घटनेत दिग्गज ड्रायव्हर हरी सिंग यांच्यासह दोन भारतीय पुरुष बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वेळा 'इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप' जिंकणारे हरी सिंग आणि गौतम सिंघानिया यांच्यासह एकूण सात जण त्या स्पीडबोटमध्ये होते. बोटीचा अपघात झाल्यानंतर सिंघानिया आणि इतर काही जणांना वाचवण्यात यश आले आहे, मात्र हरी सिंग आणि इतर बेपत्ता व्यक्तींचा शोध अद्याप सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण मोटारस्पोर्ट्स विश्वात चिंतेचे वातावरण आहे. दिग्गजांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. चंदीगडचे रॅली ड्रायव्हर रतन ढिल्लो यांनी 'X' वर (पूर्वीचे ट्विटर) आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, "हे अत्यंत दुर्दैवी आहे... भारतीय मोटरस्पोर्ट्सचे खरे दिग्गज आणि जेके टायर तसेच मर्सिडीजशी निगडित असलेले हरी सिंग सर मालदीवमधील स्पीडबोट अपघातानंतर बेपत्ता झाले आहेत.बचाव कार्य सुरू होऊन २२ तासांहून अधिक काळ लोटला असून भारतीय नौदल आणि मालदीवचे प्रशासन सातत्याने शोध घेत आहे. सुदैवाने, श्री. गौतम सिंघानिया यांच्यासह ६-७ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. हरी सरांना सध्या आपल्या प्रार्थनेची गरज आहे, ते सुखरूप परत यावेत हीच अपेक्षा!"
हरी सिंग हे रॅली ड्रायव्हिंगमधील त्यांच्या लक्षवेधी कारकीर्दीसाठी ओळखले जातात. त्यांनी १९९० च्या दशकात पाच वेळा 'इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप' जिंकली. 'आशिया झोन रॅली चॅम्पियनशिप'चे पहिले विजेतेपद मिळवण्याचाही बहुमान पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, त्यांनी 'जेके टायर मोटरस्पोर्ट'मध्ये ऑपरेशन्स हेड म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय, त्यांनी मर्सिडीज-बेंझ इंडियामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.