

२०२५ मध्ये भारताने ३ कसोटी मालिका खेळल्या आणि फक्त एक जिंकली.
भारतीय संघाने २०२५ मध्ये फक्त तीन टी-२० सामने गमावले.
कसोटीत २०२५ मध्ये भारताचे ४ सामने अनिर्णीत राहिले.
indian cricket team test odi t20 performance in 2025 year
भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या कालावधीत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांवर आपले नाव कोरले, मात्र कसोटी क्रिकेटमधील संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाची २०२५ मधील मोहीम आता पूर्ण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर या वर्षात आता एकही सामना खेळायचा नाहीये. टीम इंडियाची पुढील मालिका आता २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे.
२०२५ मध्ये भारताने तिन्ही फॉरमॅट मिळून एकूण ४६ सामने खेळले, त्यापैकी ३२ सामन्यांत विजय मिळवला तर १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला. भारताची विजयाची टक्केवारी ७० च्या आसपास राहिली. ही आकडेवारी वरवर पाहता शानदार वाटत असली, तरी कसोटीत अधिक सरस कामगिरी झाली असती, तर हे आकडे अधिक प्रभावी दिसले असते.
या वर्षात रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले.
२०२५ मध्ये भारतीय संघाची सर्वात खराब कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. याउलट, वनडेमध्ये संघाने आपला दबदबा कायम राखला, तर टी-२० मध्ये भारताचा विक्रम 'अदभुत, अजोड आणि लाजवाब' असा राहिला. भारतीय संघाने या १२ महिन्यांच्या प्रवासात चॅम्पियन्स ट्रॉफी (वनडे) आणि आशिया चषक (टी-२०) ही दोन मोठी विजेतेपदे पटकावली. या विजयामुळे भारताने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आणि आशियातील आपले वर्चस्वही अबाधित राखले. मात्र, क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये (कसोटी) भारतीय संघाला मोठ्या सुधारणांची गरज आहे. ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेली कसोटीतील घसरण २०२५ मध्येही कायम दिसली.
भारताने २०२५ मध्ये १० कसोटी सामने खेळले, त्यापैकी ४ सामन्यांत विजय तर ५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. भारताला इंग्लंडमध्ये २ आणि मायदेशात वेस्ट इंडिजवर २ विजय मिळवता आले. मात्र, सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून १, इंग्लंडमध्ये २ आणि मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून २ पराभव पत्करावे लागले. शुभमन गिल आता या फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवत चांगली झुंज दिली होती. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'च्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी भारताच्या हातून निसटली.
विरुद्ध ऑस्ट्रेलिया : १ सामना : ० विजय : १ पराभव
विरुद्ध इंग्लंड : ५ सामने : २ विजय : २ पराभव : १ ड्रॉ
विरुद्ध वेस्ट इंडिज : २ सामने : २ विजय : ० पराभव
विरुद्ध दक्षिण आफ्रिका : २ सामने : ० विजय : २ पराभव
एकूण : १० सामने : ४ विजय : ५ पराभव : १ ड्रॉ
१२ वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जाभारताने २०२५ मध्ये १४ वनडे सामने खेळले. यात ९ सामने द्विपक्षीय मालिकांमधील होते तर ५ सामने चॅम्पियन्स ट्रॉफीचे होते. इंग्लंडला ३-० ने धूळ चारून भारताने वर्षाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर सलग पाच सामने जिंकून भारताने तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्याच भूमीत २-१ ने पराभव स्वीकारावा लागला, पण दक्षिण आफ्रिकेला २-१ ने मात देत भारताने वर्षाचा शेवट विजयाने केला.
विरुद्ध इंग्लंड : ३ सामने : ३ विजय : ० पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफी : ५ सामने : ५ विजय : ० पराभव
विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ३ सामने : १ विजय : २ पराभव
विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ३ सामने : २ विजय : १ पराभव
एकूण : १४ सामने : ११ विजय : ३ पराभव
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी २०२५ मध्येही कायम राहिली. सूर्यकुमार यादव स्वतः धावाांसाठी झगडत असला तरी, त्याच्या कप्तानीखाली टीम इंडियाने यशाची नवनवीन शिखरे सर केली. या फॉरमॅटमध्ये भारताने २२ सामने खेळले आणि १६ जिंकले. केवळ ३ सामन्यात पराभव झाला तर ३ सामने रद्द झाले. या काळात भारताने आशिया चषक जिंकला, जिथे सलग ७ सामने जिंकण्याचा विक्रम केला. यातील ३ विजय हे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होते. याशिवाय भारताने इंग्लंडला ४-१, ऑस्ट्रेलियाला २-१ आणि दक्षिण आफ्रिकेला ३-१ ने पराभवाची धूळ चारली.
विरुद्ध इंग्लंड : ५ सामने : ४ विजय : १ पराभव
आशिया चषक : ७ सामने : ७ विजय : ० पराभव
ऑस्ट्रेलिया : ५ सामने : २ विजय : १ पराभव : २ रद्द
दक्षिण आफ्रिका : ५ सामने : ३ विजय : १ पराभव : १ रद्द
एकूण : २२ सामने : १६ विजय : ३ पराभव : ३ रद्द