

टीम इंडियाचा नवा एकदिवसीय (ODI) कर्णधार शुभमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा पूर्णपणे भाग असतील, यावर शिक्कामोर्तब केला आहे. गिलने स्पष्ट केले की, या दोन्ही दिग्गजांचा अनुभव, कौशल्य आणि संघातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, त्याने रोहित शर्माचे शांतता आणि संघभावना हे गुण आत्मसात करण्याची इच्छाही व्यक्त केली.
गिलला भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माने संघाचे नेतृत्व उत्कृष्टपणे सांभाळले होते. या नेतृत्त्व बदलामुळे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली, रोहित आणि विराटच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत अनेक अंदाज बांधले जात होते.
या चर्चांवर पूर्णविराम देत शुभमन गिलने पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले की, ‘रोहित आणि विराट यांच्याकडे जो अनुभव आणि कौशल्य आहे, तो खूप कमी खेळाडूंकडे पहायला मिळतो. त्यांनी भारतासाठी जेवढे सामने जिंकले आहेत, तेवढी कामगिरी फार कमी खेळाडूंना साध्य करता आली आहे. त्यांची क्षमता, गुणवत्ता आणि अनुभव संघासाठी अमोल आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पूर्णपणे संघाचा भाग असतील.’
गिलने यावेळी रोहित शर्मा यांच्याकडून शिकलेल्या गोष्टीही शेअर केल्या. तो म्हणाला, ‘मी रोहित शर्माकडून अनेक चांगले गुण आत्मसात केले आहेत. त्याची शांतवृत्ती, संघात मैत्रीपूर्ण आणि आपलेपणाची भावना निर्माण करणे हे त्याचे गुण माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. हेच गुण मी त्यांच्याकडून आत्मसात करून माझ्यामध्ये रुजवू इच्छितो,’ असे त्याने व्यक्त केले.
तज्ज्ञांच्या मते, भारत आता नवीन नेतृत्वाखाली संक्रमण काळातून जात आहे. अशा वेळी गिलचे हे स्पष्ट विधान स्थिरता आणि स्पष्टतेचा संदेश देणारे आहे. संघ भविष्याकडे पाहत असला तरी, रोहित आणि विराटसारखे अनुभवी खेळाडू आजही संघासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा अनुभव मोठ्या स्पर्धांमध्ये, विशेषत: विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये संघासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून हा एक सकारात्मक संकेत आहे. तरुण कर्णधार शुभमन गिल याने अनुभव आणि नवीन ऊर्जा यांचा समतोल संघात राखला जाईल, हा विश्वास दिला आहे. यामुळे खेळाडूंना आत्मविश्वास मिळेल आणि संघाची कामगिरी निश्चितच सुधारेल. हा संदेश संघ व्यवस्थापन खेळाडूंच्या योग्यता आणि अनुभवाला किती महत्त्व देते, ही बाब अधोरेखीत केला आहे.
रोहित आणि विराटचे योगदान केवळ मैदानावरील कामगिरीपुरते मर्यादित नसून, ते संघाची मानसिकता आणि नेतृत्त्वशैली यासाठीही महत्त्वाचे आहे. त्यांच्या वनडे संघातील उपस्थितीमुळे आगामी काळातही या फॉरमॅटमध्ये भारताची कामगिरी मजबूत राहील, अशी अशा गिलने व्यक्त केली आहे.