Rinku Singh Underworld Threat : रिंकू सिंहला अंडरवर्ल्डची धमकी! 5 कोटींच्या खंडणीची मागणी, लग्नापूर्वी वाढली चिंता
मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांनी टीम इंडियाचा खेळाडू रिंकू सिंह याला धमकी देत त्याच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. ही धमकी यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंह याच्या प्रमोशनल टीमला लक्ष्य करून धमकीचे संदेश पाठवण्यात आले होते.
खंडणी प्रकरणांचे धागेदोरे
माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांनाही यापूर्वी धमकी मिळाली होती, असे वृत्तसंस्था आयएएनएसने मुंबई गुन्हे शाखेच्या हवाल्याने दिले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर झिशान सिद्दिकी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही धमकी त्यांना १९ ते २१ एप्रिल दरम्यान मिळाली होती.
या प्रकरणी इंटरपोलच्या मदतीने त्रिनिदाद अँड टोबॅगोमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नावेद अशी त्यांची नावे असून, ते दोघेही ‘डी कंपनी’चे हस्तक असल्याचे सांगितले जात आहे. याच खंडणी प्रकरणाच्या तपासादरम्यान रिंकू सिंह यालाही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
रिंकू सिंहच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील सिलेंडर पुरवठा करण्याचे काम करत असत. अत्यंत साधे आणि कष्टप्रद बालपण रिंकूने अनुभवले. मात्र, आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने एका सामन्याच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला आणि त्यांचे भाग्य उजळले. आज तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. अलीकडेच त्याने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा
रिंकू सिंह याने नुकताच समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा केला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. वाढती लोकप्रियता आणि यश पाहता, रिंकू सिंह याच्यावर झालेला हा अंडरवर्ल्डचा दबाव निश्चितच चिंताजनक आहे. रिंकू सिंह याच्या टीमलाच ही धमकी कशासाठी देण्यात आली, याचा पोलिस तपास करत आहेत.

