

Virat- Rohit ODI selection : भारतीय एकदिवसीय (वन-डे) क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे २०२७चा विश्वचषक स्पर्धेत खेळणार का? या प्रश्नावर आता खल सुरु झाला आहे. टीम इंडियाचे सिलेक्टर अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौर्यापूर्वी रोहित शर्माची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करत शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निर्णयाने रोहित शर्मांच्या चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंच्याही भूवया उंचावल्या. या गोंधळात आगरकरांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांबद्दल स्पष्ट उत्तर दिले नाही. आता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन यानेही रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवडीवरुन अजित आगरकरांना इशारा दिला आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाले आहेत. त्यांनी आता फक्त एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले ओ. त्यांनी यापूर्वी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, निवडकर्त्यांचे अलीकडील मौन सूचित करते की, या दोघांबाबत भविष्यात योजना बदलल्या आहेत. असे मानले जाते की, निवडकर्ते लवकरच विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवतील.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवडीबाबत इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचासाठी पुढील कार्यकाळ कठीण असू शकतो, कारण त्यांना माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. मला वाटते की हा अजित आगरकरसाठी कठीण शेवट असू शकतो. येथे कोणी जिंकले तर मला वाटते की ते विराट कोहली आणि रोहित शर्मा असतील, अजित आगरकर नाही... असेही शक्य आहे की, गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला गेला असेल."
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीचा वारसा आणि प्रभाव रोहित शर्मापेक्षा खूपच जास्त आहे. विराट कोहलीला डावलणे हे टीम इंडियासाठी महागात पडू शकते. अत्यंत दबाबाच्या परिस्थितीत विराटचा खेळ बहरतो. त्याच्या नावावर मोठ्या धावा आहेत, त्याचे वलय मोठे आहे. रोहित शर्माचे तसे नाही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटइतका प्रभावशाली नव्हता. आता भविष्यात या दोन दिग्गज खेळाडूंची संघात निवड दिवसेंदिवस अधिकाधिक मनोरंजक होण्याची अपेक्षा आहे, असेही स्टीव्ह हार्मिसनने म्हटले आहे.