T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या वादळात कॅनडाचा पालापाचोळा, किवी संघाची 'सुपर-८'मध्ये धडक

New Zealand vs Canada : युवराज समराच्या ऐतिहासिक शतकाला फिलिप्स-रवींद्रचे चोख प्रत्युत्तर
T20 World Cup 2026 NZ vs Canada New Zealand win by 8 wickets book Super Eight berth
Published on
Updated on

T20 World Cup 2026 NZ vs CAN New Zealand win by 8 wickets

चेन्नई : चेन्नईच्या रणरणत्या उन्हात कॅनडाचा १९ वर्षीय फलंदाज युवराज समरा याने आपल्या बॅटमधून धावांची आतिषबाजी केली. त्याने साकारलेल्या ११० धावांच्या (६५ चेंडू, ११ चौकार, ६ षटकार) तुफानी खेळीने क्रिकेट रसिक मंत्रमुग्ध झाले. टी-२० विश्वचषक २०२६ मधील हे सलग दुसरे वैयक्तिक शतक ठरले. मात्र, दुर्दैवाने समराची ही देदीप्यमान खेळी विजयाचे तोरण बांधण्यास अपुरी पडली.

कॅनडाने दिलेल्या १७३ धावांचे आव्हान, न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र या जोडगोळीने अवघ्या १६ व्या षटकात लीलया गाठून विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह किवी संघाने दिमाखात 'सुपर-८' मध्ये प्रवेश केला.

धावांचा पाठलाग की विजयाचा झंझावात?

चेन्नईच्या खेळपट्टीवर समराच्या ११० धावांच्या खेळीनंतरही कॅनडाची धावसंख्या तोकडीच वाटत होती. न्यूझीलंडच्या फिन ॲलन आणि टिम सेफर्ट यांनी त्यांच्या डावाची सुरुवात वादळी केली. त्यानंतर कॅनडाने पलटवार केला.

T20 World Cup 2026 NZ vs Canada New Zealand win by 8 wickets book Super Eight berth
Gautam Gambhir Olympic Team Coach : गंभीरला ‘लॉटरी’! २०२८ च्या ऑलिम्पिकपर्यंत टीम इंडियाचा हेड कोच राहण्याची शक्यता

डावखुरा फिरकीपटू साद बिन जफरने सेफर्टला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर डिलन हेलीगरने फिन ॲलनला माघारी धाडले. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ॲलनचा फटका चुकला आणि कव्हरमध्ये शिवम शर्माने त्याचा झेल टिपला. मैदानी पंचांनी हा झेल योग्य की अयोग्य यावर शंका उपस्थित केल्याने तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली, ज्यानंतर ॲलनला बाद घोषित करण्यात आले. ३० धावांत २ गडी बाद झाल्यावर कॅनडाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती, मात्र ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र या जोडीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.

विक्रमी भागीदारी आणि फिलिप्सचे वेगवान अर्धशतक

फिलिप्स आणि रवींद्र यांनी पॉवरप्लेअखेर धावसंख्या २ बाद ६० पर्यंत नेली आणि मधल्या षटकांतही आपली आक्रमकता कायम ठेवली. १० च्या सरासरीने धावा कुटत त्यांनी १० व्या षटकात धावफलक १०६ पर्यंत पोहोचवला. याच दरम्यान, ग्लेन फिलिप्सने अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक झळकावत टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडसाठी सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा मान पटकावला.

दुसऱ्या बाजूला रचिन रवींद्रनेही आपले पाय रोवले होते. १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने एकूण ८ चौकार आणि ९ षटकार ठोकले आणि १५.१ षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १४६ धावांची अभूतपूर्व भागीदारी केली.

१९ वर्षीय युवराज समराचा ऐतिहासिक पराक्रम

तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या सत्रात कॅनडाच्या १९ वर्षीय युवराज समराने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने दिलप्रीत बाजवा (३६ धावा) सोबत पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. समरा प्रचंड आक्रमक मोडमध्ये होता; त्याने जेम्स नीशमच्या सहाव्या षटकात ४, ४, ४, ६ अशा धावा वसूल केल्या.

T20 World Cup 2026 NZ vs Canada New Zealand win by 8 wickets book Super Eight berth
Ishan Kishan 2.0 : नव्या ‌‘किशन अवतारा‌’चे गुपित

मधल्या षटकांत न्यूझीलंडने धावांच्या गतीवर काहीसा अंकुश ठेवला, परंतु १३ व्या षटकात समराने कोल मॅककॉन्चीला दोन षटकार आणि एक चौकार मारत पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले. काईल जेमीसनने बाजवाचा बळी घेत ही जोडी फोडली. समराने अवघ्या ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण करत टी-२० विश्वचषकातील 'सर्वात तरुण शतकवीर' होण्याचा बहुमान मिळवला. अंतिम षटकांत मॅट हेन्री, नीशम आणि जेकब डफी यांनी अचूक मारा केल्याने कॅनडाला ४ बाद १७३ धावांपर्यंतच मजल मारता आली, जी अखेर अपुरी ठरली.

संक्षिप्त धावफलक:

कॅनडा : २० षटकांत १७३/४ (युवराज समरा ११०, दिलप्रीत बाजवा ३६; जेकब डफी १-२५)

न्यूझीलंड : १५.१ षटकांत १७६/२ (ग्लेन फिलिप्स ७६*, रचिन रवींद्र ५९*; साद बिन जफर १-२७)

निकाल : न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news