

- निमिष वा. पाटगावकर
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यावर मला पहिल्यांदा काय आठवली असेल ती म्हणजे विश्वचषकाच्या संघ निवडीची मुंबईच्या ‘बीसीसीआय’ मुख्यालयात झालेली पत्रकार परिषद. कार्यवाह देवजित सैकिया यांनी संघ जाहीर केल्यावर पहिली चर्चा होती ती म्हणजे शुभमन गिलला वगळण्याची आणि दुसरी चर्चा होती ती म्हणजे भारतातच विश्वचषक असताना दोन-दोन यष्टिरक्षक कशाला हवेत त्याची? इशान किशनचे भारतीय संघात ते पुनरागमन होते आणि त्याने ते दणक्यात साजरे केले ते त्याच्या फलंदाजीने पाकिस्तानविरुद्ध विजयाची पायाभरणी करून. 2023 पासून म्हणजे जवळपास तीन वर्षे इशान किशन भारतीय संघाच्या चर्चेतही नव्हता. तेव्हा त्याने स्थानिक क्रिकेट खेळायला नकार दिला असल्याने हे इशान किशनसारखे नव्या पिढीचे खेळाडू फक्त ‘आयपीएल’वर डोळा ठेऊन असतात, देशाची त्यांना काही पडलेली नसते, अशी भरपूर टीकाही झाली होती. या टीकेचा धनी असलेलाच रविवारी रात्री भारतातील क्रिकेटरसिकांचा लाडका झाला.
इशान किशनचे हे 2.0 व्हर्जन त्याच्या फटकेबाजीने नेत्रसुख देणारे आहेच; पण ज्या जबाबदारीने तो खेळत आहे, ते बघता या तीन वर्षांने त्याला बरेच काही शिकवले असल्याची ग्वाही त्याच्या परिपक्वतेतून दिसते. भारतासाठी तुम्ही कसोटी, एक दिवसीय किंवा टी-20 क्रिकेट खेळा; पण भारतीय मैदानावर खेळत असलात, तर तुम्हाला अनुक्रमे रणजी करंडक, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळल्याच पाहिजेत, हे या विश्वचषकातील इशान किशनच्या आतापर्यंतच्या कामगिरीतून दिसून आले आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत यावर्षी इशान किशन जीव तोडून खेळला. त्याने या वीस षटकांच्या फॉरमॅटमध्ये 10 डावांत 57.44 च्या सरासरीने तब्बल 517 धावा काढल्या. यात अंतिम सामन्यात काढलेल्या शतकाचाही समावेश आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा अंतिम सामन्यात झारखंडचा सामना हरियाणाविरुद्ध होता. इशान किशनचा सलामी जोडीदार विराट सिंगला हरियाणाच्या अंशुल कंभोजने पहिल्याच षटकात बाद केले. या परिस्थितीत अजून एक बळी मिळाला असता, तर हरियाणाचे पारडे वरचढ ठरले असते हे जाणून इशान किशनने तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कुमार कुशाग्रच्या साथीने धावा काढायला सुरुवात केली. पहिला पॉवर प्ले संपेपर्यंत इशान किशनने झारखंडची धावसंख्या 1 बाद 67 अशा सुस्थितीत नेऊन ठेवली आणि हरियाणाच्या गोलंदाजांना वरचढ होऊन दिले नाही. त्याने केवळ आपलाच खेळ उंचावला नाही, तर समोरच्या कुशाग्रला ही मनोबल दिले. इशान किशनने आपले अर्धशतक 24 चेंडूंत, तर कुशाग्रने 29 चेंडूंत साजरे करून झारखंडची बाजू मजबूत केली. त्याने 49 चेंडूंत 10 षटकारांच्या मदतीने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सर्वात जलद शतक साजरे करत झारखंडचा विजय पक्का केला.
या कहाणीत तुम्ही सलामीवीर विराट सिंगच्याऐवजी अभिषेक शर्मा आणि कुमार कुशाग्रच्या ऐवजी तिलक वर्मा ही नावे घातलीत, तर तुम्हाला इशान किशनने या विश्वचषकात जे केले त्याचा सराव कुठे केला हे दिसते. अभिषेक शर्माचे बेभरवशाचे क्रिकेट फळाला आले, तर आनंदच आहे. त्याचा दिवस असेल, तर जगातील कुठचीही गोलंदाजी पोपटवाडीची वाटायला लागते; पण जर तो लवकर बाद झाला, तर प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढू न देण्यासाठी इशान किशन जबाबदारी घेत आहे, हे भारतासाठी खूप सुखावह आहे. विशेषतः शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंगला अजून हवा तसा सूर गवसला नसल्याने पहिल्या तीन खेळाडूंनी आठ ते नऊच्या सरासरीने कमीत कमी पहिली दहा ते बारा षटके खेळून काढायची जबाबदारी इशान किशन घेत आहे.
ही जबाबदारी घेताना तो अंधाधुंद फटकेबाजी करत नाही, हे विशेष. त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनानंतर त्याने 7 सामन्यांत 53.3 च्या सरासरीने आणि तब्बल 215.6 च्या स्ट्राईक रेटने 373 धावा केल्या आहेत. इशान किशनच्या या पुनरागमनात त्याची मेहनत दिसून येते ती त्याच्या ऑफ साईडच्या फलंदाजीबाबत. साधारण गेल्या वर्षीपर्यंत इशान किशनसाठी लेग साईडचे फटके हे धावा जमवायचे प्रमुख अस्त्र होते. त्याच्या मिडिल आणि लेगवरचे फिरकीचे आणि जलदगती गोलंदाजांचे चेंडू तो स्वीप, हुक, पूल करून सीमापार करायचा; पण ऑफ साईडच्या फटकेबाजीचा त्याचा स्ट्राईक रेट जेमतेम साठ होता. हे त्याचे जुने रूप पालटून नव्या अवतारात त्याने ऑफ साईडच्या फटाक्यांवर प्रभुत्व मिळवले. रविवारी पाकिस्तानने जेव्हा फिरकीचा माराच ठेवला आणि त्यातही सईम अयुब आणि कर्णधार सलमान अली आगासारखे किशनच्या बॅटपासून चेंडू दूर वळवणारे ऑफ स्पिनर त्याच्या समोर आले तेव्हा या नव्या रूपातील किशनने त्यांचा चांगलाच समाचार घेतला. इशान किशनच्या एकूण धावांच्या एक तृतीयांश धावा त्याने ऑफ साईडच्या फटक्यातून काढल्या.
इशान किशनच्या या विश्वचषकातील खेळ्यांनी भारतीय संघाला एक भक्कम आधार तर मिळाला आहेच; पण शेवटी हा खेळ असल्याने प्रत्येक सामन्यात असेच घडेल, अशी अपेक्षा आपण ठेऊ शकत नाही. इथे खेळाडू हा महत्त्वाचा नाही, तर धोरण महत्त्वाचे आहे. समजा एखाद्या सामन्यात इशान किशनला अपयश आले, तर हेच धोरण अभिषेक शर्माकडून राबवायची अपेक्षा आहे. पहिल्या पॉवर प्लेत एक पेक्षा जास्त बळी न देता पन्नास ते साठ धावा काढणे आणि दहा षटकांत सामना प्रतिस्पर्ध्यापासून दूर नेऊन ठेवायचा ही पहिल्या तीन फलंदाजांची संयुक्तिक जबाबदारी असली पाहिजे. या पाकिस्तानविरुद्धच्या आणि एकूणच विश्वचषकातील नव्या रूपातील इशन किशनच्या खेळीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सक्ती केल्याबद्दल आपल्या निवड समितीचेही कौतुक करायलाच हवे. इशान किशन जर देशांतर्गत स्पर्धेत खेळायला नकारच देत राहिला असता, तर त्याच्या क्षमतेचे गुपित कदाचित त्यालाच कळले नसते.