Cricket Boycott History : १९९६ ते २०२६..! मैदान सोडून पळण्याची ही पहिली वेळ नाही, जाणून घ्या विश्वचषकातील ‘बहिष्कारा’चा इतिहास
T20 World Cup 2026 World Cup Controversy World Cup boycott history
कोलंबो : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या साखळी सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान सरकारच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. पाकिस्तानचा संघ स्पर्धेत सहभागी होईल, मात्र भारतासोबत खेळणार नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. भारतीय उपखंडातील क्रिकेट बोर्डांमधील वाढता तणाव या निर्णयाला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी बांगलादेशनेही सुरक्षेच्या कारणास्तव भारतात होणाऱ्या विश्वचषकातून माघार घेतली होती, त्यानंतर स्कॉटलंडला या स्पर्धेत स्थान देण्यात आले. तथापि, विश्वचषकाच्या इतिहासात एखाद्या संघाने राजकीय किंवा सुरक्षेच्या कारणास्तव विशिष्ट सामन्यावर किंवा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही.
ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजने श्रीलंकेला जाणे नाकारले
१९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान श्रीलंका गृहयुद्धाच्या सावटाखाली होता. स्पर्धेच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी कोलंबोमधील एका बँकेत झालेल्या बॉम्बस्फोटात ९१ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या दोन्ही बलाढ्य संघांनी सुरक्षेचे कारण देत श्रीलंकेत जाऊन खेळण्यास नकार दिला. दोन्ही संघ मुंबईतच थांबले, परिणामी श्रीलंकेला या दोन्ही सामन्यांत 'वॉकओव्हर' देण्यात आला. विशेष म्हणजे, गुण गमावूनही हे तिन्ही संघ पुढील फेरीत पोहोचले होते.
२००३ : इंग्लंडचा झिम्बाब्वेवर बहिष्कार
२००३ च्या विश्वचषकात इंग्लंडचा सामना झिम्बाब्वेतील हरारे येथे होणार होता. त्यावेळी ब्रिटनमधील टोनी ब्लेअर सरकार आणि झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यातील राजकीय संबंध विकोपाला गेले होते. त्यातच खेळाडूंना धमक्या मिळाल्याने नासिर हुसेनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तो सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले आणि इंग्लंडला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
२००३ : न्यूझीलंडचा केनियाला जाण्यास नकार
त्याच विश्वचषकात न्यूझीलंडनेही केनियातील नैरोबी येथे खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. नैरोबीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची गुप्तचर माहिती मिळाल्याचा दावा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केला होता. न्यूझीलंडने माघार घेतल्याने केनियाला गुण बहाल करण्यात आले. याच गुणांच्या जोरावर केनियाने ऐतिहासिक कामगिरी करत थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

