

कतारमध्ये पार पडलेल्या 'मॅच फॉर होप' (Match for Hope) या धर्मादाय फुटबॉल सामन्यातील एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फुटबॉलच्या मैदानात अचानक 'WWE'चा थरार पाहायला मिळाल्याने चाहते थक्क झाले आहेत.
ही मॅच खरं तर डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीच्या रिंगमधील नव्हती, तर ३० जानेवारी २०२६ रोजी कतारमध्ये धर्मादाय फुटबॉलची होती. या सामन्यात जगभरातील दिग्गज कंटेंट क्रिएटर्स आणि फुटबॉल स्टार्स सहभागी झाले होते. मात्र, संपूर्ण सामन्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे प्रसिद्ध ब्रिटीश युट्यूबर KSI आणि अरब क्रिएटर बिलाल फदिली (अबोफ्ला) यांच्यातील WWE 'कुस्ती'ची!
काय घडले?
सामना रंगात आलेला असताना युट्यूबर KSI चेंडू आपल्या ताब्यात घेऊन गोलच्या दिशेने वेगाने पुढे सरकत होता. तितक्यात, प्रतिस्पर्धी संघातील बिलाल फदिली (अबोफ्ला) याने त्याला रोखण्यासाठी फुटबॉलचे सर्व नियम बाजूला सारले. अबोफ्लाने चेंडूकडे लक्ष न देता थेट KSI च्या अंगावर धाव घेतली आणि एखाद्या प्रो-रेसलरप्रमाणे त्याच्या खांद्यावर उडी मारली.
KSI ला अबोफ्लाने कवेत घेऊन जमिनीवर पाडले, ते दृश्य पाहून स्टेडियममधील प्रेक्षक आणि कॉमेंटेटर्सना WWE स्मॅकडाउन मधील एखाद्या फाईटची आठवण झाली. हा 'टॅकल' इतका अनपेक्षित आणि मजेशीर होता की स्वतः KSI आणि अबोफ्ला देखील हसायला लागले. पण यामुळे प्रेक्षकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. या घटनेनंतर "हा फुटबॉल सामना आहे की रेसलिंग मॅनिया?", "अबोफ्लाला पुढच्या WWE ड्राफ्टमध्ये स्थान मिळायला हवे," अशा मजेशिर कमेंट्स युजर्स करत आहेत.