

south africa vs australia wtc final steve smith is playing his 6th icc final
क्रिकेटरसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा क्षण अखेर आला. कसोटी क्रिकेटमधील विश्वचषक मानल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याला बुधवारी (दि. 11) सुरुवात झाली. या महत्त्वपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे बलाढ्य संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
या सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या सर्वाधिक आयसीसी फायनल खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वाधिक आयसीसी फायनल खेळण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. आयसीसी फायनलमध्ये एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांचा समावेश होतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 9 आयसीसी फायनल खेळल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ भारताचाच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा असून त्याने 8 आयसीसी फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीत 7 आयसीसी फायनल खेळण्याचा पराक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाचे यशस्वी कर्णधार राहिलेल्या रिकी पाँटिंगने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 6 आयसीसी फायनल खेळल्या. आता स्टीव्ह स्मिथनेही त्यांच्या या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा स्मिथचा सहावा आयसीसी फायनल आहे. पाँटिंग आणि स्मिथ यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचे कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनीही प्रत्येकी सहा आयसीसी फायनल खेळल्या आहेत.
रिकी पॉन्टिंग : 6 फायनल (5 विजय)
स्टीव्ह स्मिथ : 6 फायनल (4 विजय)
मिशेल स्टार्क : 5 फायनल (4 विजय)
डेव्हिड वॉर्नर : 5 फायनल (4 विजय)
शेन वॉटसन : 5 फायनल (4 विजय)
ग्लेन मॅकग्रा : 5 फायनल (4 विजय)