

श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एक डाव आणि 78 धावांनी जिंकला. सामन्याच्या चौथ्या दिवशी केवळ 28 मिनिटांत उर्वरित चार बळी मिळवून श्रीलंकेने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले आणि दोन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावे केली. या विजयासह श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेत महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली.
फिरकीपटू प्रभात जयसूर्याने चौथ्या दिवशी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 56 धावांत 5 बळी मिळवले. त्याचा हा कसोटी कारकिर्दीतील 12वा ‘पंच’ (फाईव्ह-विकेट हॉल) ठरला. कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूवर जयसूर्याने लिटन दासला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. त्यानंतरच्या षटकात त्याने नईम हसनला चकवून यष्टिचित केले. यष्टीरक्षक कुसल मेंडिसने दुखापत असूनही अप्रतिम चपळाई दाखवत यष्ट्या उडवल्या.
तैजुल इस्लामने मिडविकेटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला असता, चेंडू हवेत उडाला आणि झेलबाद झाल्याने जयसूर्याला पाचवा बळी मिळाला. त्यानंतर थरिंदू रत्नायके याने ईबादत हुसेनला पायचित करून बांगलादेशचा डाव अवघ्या 34 चेंडूंमध्ये संपुष्टात आणला.
कोलंबो कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 38.4 षटकांत 6 बाद 115 अशी होती. चौथ्या दिवशी डावाने होणारा पराभव टाळण्याचे आव्हान पाहुण्या संघासमोर होते, परंतु श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला मैदानावर टिकू दिले नाही. चौथ्या दिवशी केवळ 34 चेंडूंमध्ये बांगलादेशचा दुसरा डाव संपुष्टात आला. सकाळच्या सत्रात 5.4 षटकांच्या खेळातच श्रीलंकेने सामना खिशात घातला.
या सामन्यात फिरकीपटूंनी एकूण 9 बळी घेतले, ज्यात जयसूर्या याच्याव्यतिरिक्त थरिंदू आणि धनंजय डी सिल्वा यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. हा सामना जयसूर्या याच्यासाठी विशेष ठरला, कारण पहिल्या डावात त्याला एकही बळी मिळाला नव्हता आणि गॅले कसोटीतही त्याला केवळ एकच बळी मिळाला होता. तथापि, बांगलादेशसाठी खरे नुकसान पहिल्या डावातच झाले होते, जिथे कमकुवत फलंदाजी आणि दिशाहीन गोलंदाजीमुळे ते सामन्यात पिछाडीवर पडले. त्यानंतर श्रीलंकेने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
या सामन्याचा हिरो पाथुम निसांका ठरला. त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरिज’ या दोन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याने मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यात चमकदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो पहिल्या कसोटीत 187 तर दुस-या कसोटीत 158 धावांची खेळी करण्यात यशस्वी झाला.