रवी शास्त्रींना क्लीन चिट : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना क्लीन चीट दिली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी लंडनमधील पुस्तक प्रकाशन प्रकरणी रवी शास्त्री यांची बाजू घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी रवी शास्त्रींवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.
सौरभ गांगुली यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चौथ्या कसोटीपूर्वी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती असे स्पष्ट केले. त्यांना या प्रकरणी रवी शास्त्री यांच्या विरुद्ध कोणती कारवाई करणार असे विचारले असता त्यांनी कोणतीही कारवाई करणार नाही असे उत्तर दिले.
रवी शास्त्रींना सौरभ गांगुलींनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याप्रकरणी क्लीन चीट दिली. रवी शास्त्रींना चौथ्या कसोटीदरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांचा सपोर्ट स्टाफला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे फिजीओ कोरोना बाधित झाल्यामुळे पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना रद्द करावा लागला होता. त्यानंतर रवी शास्त्री आणि संघातील काही खेळाडूंनी लंडनमध्ये एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली असल्याचे समोर आले होते.
त्यावेळी बीसीसीआयने रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची या प्रकरणी चौकशी केल्याचेही वृत्त आले. बीसीसीआय या दोघांवर कारवाई करणार असे चित्र निर्माण झाले असताना रवी शास्त्रींना सौरभ गांगुलींनी क्लीन चीट देऊन टाकली. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी 'तुम्ही किती काळ हॉटेलच्या रुममध्ये बसून राहणार? तुम्ही दिवसभर तुमच्या घरात बंद राहणार का? तुम्ही खेळाडुंचे आयुष्य हॉटेल रुम ते मैदान असे बंदीस्त ठेवू शकत नाही. ते मानवीय दृष्टीकोणातून शक्य नाही.'
गांगुली पुढे म्हणाले की, 'मी दादागिरी कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी उपस्थित होते. तेथे जवळपास १०० लोकं होती. त्यांचे संपूर्ण लसीकरण झाले होते. पण, पुढे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. लोकांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत आहे. हीच आयुष्याची वास्तविकता आहे.'
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीसामन्यावेळी रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील भारत अरुण, आर. श्रीधरन आणि नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
त्यानंतर पाचवी कसोटी सुरु होण्यापूर्वी आदल्या दिवशी संघाचे फिजीओ योगेश परमार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर भारताचे सराव सत्र रद्द करण्यात आले. पुढे पाचवी आणि निर्णायक अशी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॉफोर्ड कसोटीही रद्द करण्यात आली.
याबाबत गांगुली म्हणाले, 'खेळाडूंनी पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. याबाबत त्यांना दोष देता येणार नाही. योगेश परमार हे खेळाडूंच्या अत्यंत जवळून संपर्कात येणारे व्यक्ती आहेत. नितीन पटेल विलगीकरणात गेल्यानंतर ते एकटेच असल्याने संघातील खेळाडुंमध्ये मुक्तपणे मिसळत होते. त्यामुळे सर्व खेळाडुंची कोरोना चाचणीही करावी लागली होती.'
ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली आहे हे खेळाडुंना समजले त्यावेळी खेळाडू हादरून गेले होते. त्यांना भीती होती की त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे की काय? ही भीती मनात घेऊन बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. तुम्हाला त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.'