पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsSL T20WC :
मार्कस स्टॉइनिसच्या झंझावाती अर्धशतकामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. स्टॉइनिसने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे हे टी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक आहे. टी 20 विश्वचषकातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. भारताचा युवराज सिंग अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. युवराजने 2007 टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध डरबनमध्ये 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. स्टॉइनिसने 327.78 च्या स्ट्राइक रेटने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्टॉइनिसने 18 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 59 धावांची मॅच विनींग खेळी खेळली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना श्रीलंकेला 6 बाद 157 धावांवर रोखले आणि त्यानंतर 16.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. या स्पर्धेतील कांगारूंचा हा पहिलाच विजय आहे. आता ऑस्ट्रेलियाचेही गुणतालिकेत 2 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुपर-12 च्या ग्रुप 1 मधील दोन सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिला पराभव आहे. ऑस्ट्रेलियाला आपला पुढचा सामना शुक्रवारी मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. स्टॉइनिसशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार अॅरॉन फिंचने 42 चेंडूत नाबाद 31 आणि मिचेल मॅशरने 17 तर डेव्हिड वॉर्नरने 11 धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेचा मुख्य गोलंदाज वानिंदू हसरंगाला आज चांगलाच फटका बसला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा स्पेल फेकला. हसरंगाने 3 षटकात एकही विकेट न घेता 53 धावा दिल्या. धनंजय डिसिल्वा, महेश टीक्षाना आणि चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने सलामीवीर पथुम निशांकाच्या 40 आणि चरित असलंकाच्या नाबाद 37 धावांच्या जोरावर 157 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांनी 1-1 बळी घेतले. श्रीलंकेच्या संघाने 120 धावांवर 6 विकेट गमावले होते. त्यानंतर असलंका आणि चमिका करुणारत्ने यांनी सातव्या विकेटच्या भागीदारीत 15 चेंडूत 37 धावा जोडून संघाची धावसंख्या 157 पर्यंत नेली. श्रीलंकेने या स्पर्धेत सलग तीन सामने जिंकले आहेत. तर पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अ गटातील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा हा प्रत्येकी दुसरा सामना आहे. यापूर्वी श्रीलंकेने एक सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कांगारू संघ अ गटात गुणतालिकेत सहाव्या स्थानावर फेकला गेला होता. आज कांगारू संघाने श्रीलंकेवर मात करून स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने फिरकीपटू अॅडम झाम्पा आजचा सामना खेळला नाही. त्याच्या जागी अॅश्टन अगरला संधी देण्यात आली आहे. त्याने चमकदार गोलंदाजी केली.
डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड.
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षना, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.