सौरभ गांगुली यांच्यावर येणार बायोपिक - पुढारी

सौरभ गांगुली यांच्यावर येणार बायोपिक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्‍तान सौरभ गांगुली यांच्यावर आता बायोपिक येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक लव रंजन यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. अंकुर गर्ग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लव रंजन यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, दादा सौरभ गांगुली यांचा बायोपिक लव फिल्म्सतर्फे निर्माण केला जाणार आहे, हे सांगताना आनंद होत आहे.

90 च्या दशकापासून ते बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळविण्यापर्यंतचा सौरभ गांगुलीचा क्रिकेटचा प्रवास यात आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम सौरभच्या नावावर आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर सौरभचा बायोपिक पाहणे रोमांचक असणार आहे. लव फिल्म्सने यापूर्वी ‘सोनू के टीटू की स्विटी,’ ‘दे दे प्यार दे,’‘मलंग,’ ‘छलांग’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लव रंजनच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटासह ‘उफ्फ’ आणि ‘कुत्ते’ हा चित्रपटही आहे.

दरम्यान, यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी यांच्यावरील बायोपिक आले आहेत तर कपिल देव यांच्यावरील ‘83’ अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे.

Back to top button