

कोलंबो: भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या नावावर दोन ऐतिहासिक विक्रमांची नोंद केली. सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गिलने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) एकाच चक्रात १००० किंवा त्याहून अधिक धावा फटकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरण्याचा बहुमान मिळवला.
यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने २०१९-२१ च्या चक्रात ९३२ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज कर्णधारांनाही न जमलेला हा पराक्रम २६ वर्षीय गिलने करून दाखवला.
या विक्रमासोबतच गिलने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ३,००० धावांचा टप्पाही पार केला. वयाच्या २६ वर्षे आणि ३४९ व्या दिवशी हा टप्पा गाठत तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करणारा चौथा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव (२६ वर्षे ३५६ दिवस) यांना मागे टाकले.
या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी असून त्यांनी वयाच्या अवघ्या २३ वर्षे २२८ व्या दिवशी ही कामगिरी केली होती. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर यांचा क्रमांक लागतो.
सामन्याच्या पहिल्या सत्रात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात संमिश्र झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने ५३ चेंडूंत ९ चौकारांसह आक्रमक ४५ धावांचे योगदान दिले, तर केएल राहुल १८ धावा काढून माघारी परतला. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत भारताने २ बाद ८८ अशी सावध धावसंख्या उभारली. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव आजारपणामुळे खेळू शकला नाही, तर मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू सारांश जैन याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.
नेतृत्वाची धुरा हाती आल्यानंतर गिलच्या फलंदाजीत आणखी चमक पाहायला मिळत आहे. कर्णधार म्हणून खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांतील १८ डावांत त्याने ७४.०६ च्या सरासरीने १,१११ धावा केल्या असून यात ६ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीचा कोणताही दबाव न घेता गिलने मैदानात आपली उत्कृष्ट कामगिरी सातत्याने कायम ठेवली आहे.