

IND vs AUS Gabba match lightning weather update:
ब्रिस्बेनच्या प्रसिद्ध गाबा स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना रंगत असताना अचानक एक धक्कादायक प्रसंग घडला. फक्त 4.5 षटकं झाल्यानंतर अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबवण्यामागचं कारण होतं. हवामानातील अचानक बदल आणि वीजांचा कडकडाट.
खेळ सुरू असताना आकाशात विजांचा कडकडाट आणि काळे ढग दिसू लागले. अंपायर शॉन क्रेग यांनी तातडीने खेळ थांबवण्याचा सिग्नल दिला आणि दोन्ही संघांना मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये परत जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मैदानावरचे कर्मचारी तत्काळ पळत आले आणि पिचवर कव्हर टाकण्यात आलं.
हवामान खात्याने काही वेळ आधीच ब्रिस्बेन परिसरात मुसळधार पावसाची आणि वीजांच्या गडगडाटाची चेतावणी दिली होती. रडारवर लाल रंगाचे ढग दिसत होते, ज्यामुळे सामना चालू ठेवणं धोकादायक ठरलं असतं. त्यामुळे खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सामना तात्पुरता थांबवण्यात आला.
मैदानातील खेळाडूंप्रमाणेच स्टेडियममधील प्रेक्षकांचीही काळजी घेण्यात आली. गाबा स्टेडियमच्या खालच्या भागातील जागा तत्काळ रिकाम्या करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना वरच्या आसनांवर हलवण्यात आलं. चाहत्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी छताखाली आसरा घेतला. ब्रिस्बेनमध्ये हवामान असं अचानक बदलण ही नवी गोष्ट नाही, याआधीही अनेक सामने पावसामुळे थांबण्यात आले आहेत.
सामना थांबवला गेला, तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली होती. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी फक्त 4.5 षटकांत 52 धावा केल्या होत्या. गिलने 16 चेंडूत 29 धावा केल्या, तर अभिषेकने 13 चेंडूत 23 धावा झळकावल्या. दोघांनाही जीवनदान मिळालं होतं आणि टीम इंडिया चांगल्या स्थितीत होती.
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह.
ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कर्णधार), जॉश इंग्लिस, टिम डेविड, जॉश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, जेवियर बार्टलेट, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, अॅडम झॅम्पा.