

Official Apology Trend brands social media campaign: सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती काही वेळातच ट्रेंड बनते. मग ती रील असो, मीम असो किंवा आता कंपन्यांचा नवा ‘Official Apology Trend’ असो. या ट्रेंडमध्ये अनेक मोठ्या ब्रँड्सनी लोकांची “माफी मागणाऱ्या” पोस्ट केल्या आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने माफी नसून, एका जाहिरात मोहीमेचा भाग आहे.
फॉक्सवॅगन, स्कोडा, टी-सीरिज, केव्हेंटर्स, डाबर, जिओ यांसारख्या ब्रँड्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यात त्यांनी लोकांची माफी मागितली आहे.
उदा. —
स्कोडा इंडिया म्हणते, “आमच्या गाड्या इतक्या चांगल्या आहेत की लोक लॉंग ड्राइव्हला जाणं थांबवू शकत नाहीत, त्याबद्दल माफी!”
फॉक्सवॅगन लिहिते, “आम्ही अशा गाड्या बनवल्या, ज्यांच्यापासून लोक दूर राहू शकत नाहीत, त्याबद्दल सॉरी!”
तर जिओने आपल्या ऑफर संदर्भात अशाच प्रकारची विनोदी ‘अपॉलॉजी’ पोस्ट टाकून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या सर्व पोस्टचा उद्देश एकच आहे तो म्हणजे लोकांना हलक्या-फुलक्या विनोदात गुंतवून ठेवणे आणि त्यांच्या उत्पादनांशी भावनिक नातं निर्माण करणे.
या ट्रेंडमध्ये कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या ‘खूप चांगल्या’ फिचर्सबद्दल माफी मागत आहेत. या पोस्ट्स इतक्या रिअल आणि मनोरंजक वाटतात की युजर्स या पोस्ट शेअर केल्याशिवाय राहू शकत नाहीत. परिणामी, ब्रँड्सना जबरदस्त ऑर्गॅनिक प्रमोशन मिळत आहे.
सोशल मीडियावरील अनेक तज्ञांच्या मते, हा ट्रेंड “फील-गुड मार्केटिंग”चं उत्कृष्ट उदाहरण आहे. जिथे ब्रँड्स थेट विक्री न करता ह्यूमर आणि इमोशनच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधतात.
या ट्रेंडचा आणखी एक भाग म्हणजे या “अपॉलॉजी पोस्ट” आता AI च्या मदतीने तयार करणं अतिशय सोपं झालं आहे. तुम्ही फक्त तुमच्या ब्रँडची प्रोफाइल आणि मेसेज AI चॅटबॉटला सांगायचा, आणि तो तुम्हाला व्हायरल होण्यासारखी अपॉलॉजी पोस्ट तयार करून देतो.
‘सॉरी’च्या नावाखाली ब्रँड्सने तयार केलेला हा ट्रेंड लोकांना गुंतवून ठेवत आहे, पण त्याचबरोबर हा ब्रँड एंगेजमेंट आणि सोशल मीडिया रीच वाढवण्याचं उत्तम साधन ठरत आहे.