

Shane Warne Rajasthan Royals Equity: राजस्थान रॉयल्सच्या विक्रीची बातमी आली आणि क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा शेन वॉर्न यांचं नाव चर्चेत आलं. कारण, टीमची विक्री झाली असली तरी त्याचा आर्थिक फायदा त्यांच्या कुटुंबाला होणार आहे आणि तोही तब्बल 460 कोटी रुपयांचा.
राजस्थान रॉयल्स ही आयपीएलमधील सर्वात चर्चित फ्रँचायझींपैकी एक आहे. आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी ही टीम सुमारे 1.63 अब्ज डॉलर (अंदाजे 15,300 कोटी रुपये) मध्ये विकली गेली. ही डील अमेरिकन गुंतवणूकदाराने केली आणि त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं मूल्य वाढलं. पण या व्यवहारात सर्वात मोठा ट्विस्ट होता शेन वॉर्न यांच्या कुटुंबाला मिळणारा फायदा.
शेन वॉर्न हे फक्त एक महान लेग स्पिनर नव्हते, तर ते एक स्मार्ट क्रिकेटरही होते. 2008 ते 2011 या काळात त्यांनी राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना प्रत्येक सीजनला सुमारे 9.35 कोटी रुपये मानधन घेतलं. पण त्यांनी केवळ पगारावर समाधान मानलं नाही. वॉर्न यांनी फ्रँचायझीकडून एक वेगळीच मागणी केली होती ती म्हणजे इक्विटी (हिस्सा).
प्रत्येक सीजनला त्यांनी 0.75% इक्विटी घेतली. ते चार सीजन खेळले, म्हणजे एकूण 3% हिस्सा त्यांनी राजस्थान रॉयल्समध्ये मिळवला. त्या वेळी कदाचित हा निर्णय फारसा चर्चेत नव्हता. पण आज तोच निर्णय ‘मास्टरस्ट्रोक’ ठरत आहे.
राजस्थान रॉयल्सची विक्री: ~15,300 कोटी रुपये
शेन वॉर्न यांचा हिस्सा: 3%
3% चा हिशोब केला तर तो जवळपास 460 कोटी रुपये होतो. वॉर्न आता या जगात नसले तरी हे संपूर्ण पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहेत. म्हणजेच, त्यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी आज फायद्याचा ठरत आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात शेन वॉर्न यांचं नाव कायम सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. ते राजस्थान रॉयल्सचे पहिले कर्णधार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच टीमने 2008 साली पहिल्याच सिजनमध्ये ट्रॉफी जिंकली.
त्यांच्या कामगिरीकडे पाहिलं तर:
4 सीजन (2008–2011)
55 सामने
57 विकेट्स
2008 मध्ये 19 विकेट्स घेत ते सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले होते.
त्यांनी केवळ गोलंदाजीच नाही, तर एक युवा आणि अनोळखी टीमला चॅम्पियन बनवण्याचं काम केलं.
शेन वॉर्न यांची ही कहाणी फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही. आज अनेक खेळाडू मोठे पगार घेतात. पण वॉर्न यांनी दाखवून दिलं की, स्मार्ट गुंतवणूक आणि इक्विटीचा विचार केल्यास कमाईचं प्रमाण कितीतरी पटीने वाढू शकतं.