Rajasthan Royals Sold : राजस्थान रॉयल्सची 15,289 कोटी रुपयांना विक्री! अमेरिकन व्यावसायिकाने खरेदी केली मालकी

IPL 2026 : या ऐतिहासिक व्यवहारामुळे राजस्थान रॉयल्स जगातील सर्वात महागडी फ्रँचायझी ठरली आहे.
IPL 2026 rajasthan royals sold for 13600 crore becoming the most expensive ipl franchise
Published on
Updated on

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एका सर्वात मोठ्या व्यावसायिक कराराची नोंद झाली आहे. अमेरिकन उद्योजक कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एका गुंतवणूकदार समूहाने राजस्थान रॉयल्स (RR) या फ्रँचायझीची १०० टक्के भागीदारी सुमारे १.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्सना (अंदाजे १५,२८९ कोटी रुपये) खरेदी केली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या प्रवासातील हा सर्वात महागडा व्यवहार मानला जात आहे.

या गुंतवणूकदार समूहामध्ये कल सोमानी यांच्यासह जगप्रसिद्ध 'वॉलमार्ट'चे रॉब वॉल्टन आणि 'फोर्ड'शी संबंधित हॅम्प कुटुंबाचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, हा मालकी हक्क बदल आयपीएल २०२६ च्या हंगामानंतर अधिकृतपणे प्रभावी होणार आहे.

कोण आहेत कल सोमानी?

कल सोमानी हे तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि स्पोर्ट्स टेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'इंट्राएज' आणि 'ट्रयूओ' सारख्या नामांकित कंपन्यांची स्थापना केली आहे. क्रिकेटव्यतिरिक्त त्यांना गोल्फमध्येही विशेष रुची आहे. टायगर वुड्स ज्या क्लबचे प्रमुख चेहरा राहिले आहेत, त्या 'मोटर सिटी गोल्फ क्लब'च्या संस्थापकांपैकी सोमानी एक आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सच्या लिलाव प्रक्रियेत एकूण ४ निविदा (Bids) आल्या होत्या, ज्यामध्ये सोमानी यांच्या समूहाने बाजी मारली.

अल्पसंख्याक गुंतवणूकदार ते पूर्ण मालक

राजस्थान रॉयल्स हा आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा (२००८) विजेता संघ आहे. युवा गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संघाने आगामी हंगामासाठी रियान पराग याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राजस्थान रॉयल्सच्या विक्रीबाबत चर्चा सुरू होत्या. कल सोमानी हे यापूर्वीच या संघात अल्पसंख्याक गुंतवणूकदार (Minority Investor) म्हणून सहभागी होते, ज्याचा फायदा त्यांना ही पूर्ण मालकी मिळवताना झाला आहे.

गुजरात टायटन्सचा विक्रम मोडला

आयपीएलच्या इतिहासात यापूर्वीही मोठे व्यवहार झाले आहेत, मात्र राजस्थान रॉयल्सचा हा व्यवहार सर्व विक्रम मोडणारा ठरला आहे. गेल्या वर्षी टोरेंट ग्रुपने 'सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स'कडून गुजरात टायटन्सची ६७ टक्के भागीदारी सुमारे ५,०२५ कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यावेळी गुजरात टायटन्सचे एकूण मूल्य ७,५०० कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. त्या तुलनेत राजस्थान रॉयल्सचे मूल्य आता दुप्पट झाले आहे.

राजस्थान रॉयल्सचा आतापर्यंतचा प्रवास

२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्याच हंगामात दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावून सर्वांना चकित केले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळ या संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली. २०२२ मध्ये संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती, परंतु गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

सॅम करन स्पर्धेतून बाहेर; दासुन शनाकाला संधी

आयपीएल २०२६ च्या मोहिमेपूर्वी राजस्थान रॉयल्सला मैदानात एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू आणि टी-२० कर्णधार दासुन शनाका याचा संघात समावेश करण्यात आला आहे. २ कोटी रुपयांच्या करारासह शनाका संघात सामील झाला आहे.

संघाचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी प्रतिक्रिया दिली की, "सॅम करनसारख्या खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी मोठी हानी आहे, मात्र दासुन शनाकाच्या अनुभवामुळे संघाचा समतोल राखण्यास मदत होईल."

नव्या जोमाने मैदानात उतरणार रॉयल्स

मालकी हक्कातील हा बदल पुढील वर्षापासून लागू होणार असला तरी, राजस्थान रॉयल्सचे सध्याचे संपूर्ण लक्ष आगामी हंगामावर आहे. नवीन कर्णधार रियान पराग आणि प्रशिक्षक कुमार संगकारा यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news