

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty Enter Hong Kong Open Semifinals
हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीतील आघाडीचे खेळाडू सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपला विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी (दि. 12) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीवर तीन गेममध्ये 2-1 ने थरारक विजय मिळवला.
गेल्या काही आठवड्यांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सात्त्विक आणि चिराग यांनी अलीकडेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी आरिफ जुनैदी आणि रॉय किंग याप या जोडीवर २१-१४, २०-२२, २१-१६ अशी मात केली. ५ लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस असलेल्या या स्पर्धेतील हा सामना ६४ मिनिटे चालला.
आठव्या मानांकित भारतीय जोडीने सुरुवातीला संथ सुरुवात केली, परंतु १२-१२ अशी बरोबरी साधल्यानंतर त्यांनी वेग पकडला. जोरदार स्मॅश मारत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना संधी दिली नाही आणि सलग पाच गुण घेत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र मलेशियाच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले. त्यांनी भारतीय जोडीला सर्वच पातळ्यांवर टक्कर दिली. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी ६-६ अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर बहुतांश वेळेस आघाडी घेतली. अखेर सात्त्विक-चिरागने २०-२० अशी बरोबरी साधली. परंतु, मलेशियाच्या जोडीने शेवटपर्यंत झुंज देत हा गेम २०-२२ ने जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये भारतीय खेळाडूंनी त्यांच्या खेळाचा स्तर उंचावला. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना एकदाही आघाडी घेऊ दिली नाही आणि सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. गुरुवारी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सात्त्विक आणि चिरागने थायलंडच्या पीरत्चाई सुकफुन आणि पक्कपॉन तेरारत्सकुल यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते.
पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिराग यांनी उपांत्य फेरी गाठली असताना, पुरुष एकेरीच्या एका सामन्याने उत्सुकता वाढवली आहे. या सामना दोन भारतीय खेळाडूंमध्ये रंगणार आहे. ही लढत उपांत्यपूर्व फेरीची असून यात लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी आमने-सामने असतील. यातील विजेता खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
प्री-क्वार्टर फेरीमध्ये लक्ष्य सेनने एच.एस. प्रणॉयचा २१-१५, १८-२१ आणि २१-१० ने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. दुसरीकडे, आयुष शेट्टीने प्री-क्वार्टर फेरीच्या सामन्यात जपानच्या खेळाडूला २१-१९, १२-२१ आणि २१-१४ ने हरवून पुढच्या फेरीत जागा मिळवली.