

Kuldeep Yadav dropped vs Pakistan speculation
आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात धमाकेदार झाली. दुबई येथे झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या संघाने यूएईला ९ गडी राखून पराभूत केले. या विजयात कुलदीप यादवची भूमिका महत्त्वाची होती. त्याने ४ बळी घेत यूएईच्या फलंदाजांना निष्प्रभ केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने यूएईला कमी धावसंख्येवर रोखले आणि केवळ ४.३ षटकांत ५८ धावांचे लक्ष्य सहज पार केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुलदीप ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. पण असे असूनही कुलदीपला १४ सप्टेंबर रोजी खेळल्या जाणा-या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून डच्चू मिळेल अशी शंका उपस्थिती केली जात आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या मते, कुलदीप यादवला पुढील सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. कुलदीप यादवच्या गोलंदाजीचे सर्वांनीच कौतुक केले आणि त्यात मांजरेकर यांचाही समावेश होता. मात्र, त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना म्हटले की, ‘कुलदीपने चांगली कामगिरी केली असल्यामुळे त्याला पुढील सामन्यात कदाचित संधी मिळणार नाही.’
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून कुलदीप यादवला फारशा संधी मिळाल्या नाहीत. याच कारणामुळे चाहते गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उल्लेखनीय आहे की, इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही कुलदीपला संधी मिळाली नव्हती. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली होती.
वास्तविक, जेव्हा यूएईविरुद्ध कुलदीपचा कहर सुरू होता, त्याच वेळी प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिले, ‘कुलदीपने एकाच षटकात ३ बळी घेतले आहेत. आता कदाचित तो पुढचा सामना खेळणार नाही.’ पण मांजरेकर यांनी असे का लिहिले? ते एखाद्या रणनीतीबद्दल चर्चा करत होते का? असे प्रश्न उपस्थित झाले. पण काहींच्या मते मांजरेकर यांची एक्स पोस्ट उपरोधिकपणातून आली असून त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
मांजरेकर यांच्या या विधानाचे कारण कुलदीपचे भारतीय संघातील आतापर्यंतचे करिअर आहे. कुलदीपने २०१७ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले, परंतु तेव्हापासून तो अनेकदा संघातून बाहेर राहिला आहे. अनेक प्रसंगी, त्याने चांगली कामगिरी करूनही त्याचा प्लेइंग ११ मधून पत्ता कट करण्यात आला आहे. अनेकवेळा संघातूनही वगळण्यात आले आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बाबतीत हे अनेकदा पाहायला मिळाले. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे ५ बळी घेतल्यानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्याला केवळ एकाच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर थेट डिसेंबर २०२२ मध्ये त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली, ज्यात त्याने पुन्हा एकदा ५ बळी घेतले. असे असतानाही त्याला पुन्हा वगळण्यात आले आणि थेट २०२४ मध्ये त्याचे पुनरागमन झाले. गेल्या वर्षीही चांगली कामगिरी करूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात त्याला एकही कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याला साखळी फेरीतील एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर सुपर-४ मध्ये जेव्हा तो मैदानात उतरला, तेव्हा त्याने शानदार कामगिरी केली. याच कारणामुळे अनेकदा भारतीय संघ व्यवस्थापनाला कुलदीपच्या चांगल्या कामगिरीनंतर अशा उपहासात्मक टीकेला सामोरे जावे लागते.
सामन्यानंतर संजय मांजरेकर यांनी कुलदीप यादवची मुलाखत घेतली आणि त्याला संधी न मिळण्याबद्दल थेट प्रश्न विचारला. मांजरेकर म्हणाले, ‘मी गेल्या काही वर्षांपासून एक गोष्ट पाहिली आहे की, तू भारतीय संघासाठी प्रत्येक सामना खेळत नाहीस. तुझ्या प्रवासात अनेकदा खंड पडला आहे. मात्र, जेव्हा तू पुनरागमन करतोस, तेव्हा तू सर्वोत्तम कामगिरी करून परततोस. याबद्दल तुझे काय मत आहे?’
मांजरेकर यांच्या प्रश्नावर कुलदीप यादवने स्पष्ट उत्तर दिले नाही. त्याऐवजी त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, ‘टी-२० फॉरमॅटमध्ये गोलंदाजीची लाईन-लेन्थ समजून घेणे आणि फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करत आहेत हे ओळखणे महत्त्वाचे आहे. फलंदाज तुमच्याविरुद्ध काय करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे देखील तुम्ही पाहणे आवश्यक आहे.’
आशिया चषकात भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. कुलदीप यादवने यूएईविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला संघातून बाहेर ठेवणे संघ हिताचे नसेल असे तज्ज्ञांचे मत आहे. तो आपल्या फिरकीने पाकिस्तानी फलंदाजांनाही अडचणीत आणू शकतो. अशा परिस्थितीत, कुलदीपचे खेळणे निश्चित मानले जात आहे. तो संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे.