

Azharuddin on Sarfaraz Khan
हैदराबाद : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणार सरफराज खान आता भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. विजय हजारे ट्रॉफीत सरफराजने १५७, ५५ आणि ६२ धावांची दमदार खेळी केली. रणजी ट्रॉफीत हैदराबादविरुद्ध तब्बल २२७ धावांची भव्य खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. आता टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानेही सरफराजबाबत मोठे विधान केले आहे.
या प्रवासात सरफराजला अनुभवी खेळाडूंचा पाठिंबाही लाभत आहे. विशेषतः माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्याला मार्गदर्शन केले. रिव्हर्स स्विंगचा सामना कसा करायचा, याबाबत अझरुद्दीन यांनी सरफराजशी सविस्तर चर्चा केली. 'द स्पोर्टस्टार'च्या वृत्तानुसार, अझरुद्दीन यांची भेट घेण्यासाठी सरफराज तब्बल ४५ मिनिटे वाट पाहत उभा होता.मात्र, या यशाचे श्रेय घेण्यास अझरुद्दीन यांनी स्पष्ट नकार दिला. “शेवटी त्याने जाऊन मैदानावर खेळ केला आणि धावा केल्या. त्यामुळे संपूर्ण श्रेय त्यालाच मिळायला हवे. त्याने माझे नाव घेतले, याबद्दल मी आभारी आहे, पण त्याची गरज नव्हती. तो धावा करत राहो आणि यशस्वी होवो, एवढेच मला हवे आहे. त्याच्याकडून मला मिळणारी हीच सर्वोत्तम भेट असेल,” असे अझरुद्दीन यांनी सांगितले.
सरफराजच्या खेळातील आक्रमकतेचेही अझरुद्दीन यांनी विशेष कौतुक केले. “तो उत्तम आणि आक्रमक फलंदाज आहे. सामना कधीही आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता त्याच्यात आहे. गोलंदाजाने वर्चस्व गाजवलेले त्याला आवडत नाही. फलंदाज म्हणून धावा करणे अत्यावश्यक असते. चांगल्या गोलंदाजाला जर तुम्ही वरचढ होऊ दिले, तर अडचण येते. खेळपट्टी कशी होती, हे मला माहीत नाही; पण चेंडू स्विंग होत होता आणि उसळीही अनिश्चित होती. अशा परिस्थितीत चांगल्या गतीने धावा करणे त्याच्या गुणवत्तेचेच द्योतक आहे,” असे ते म्हणाले.
सरफराजचा आंतरराष्ट्रीय प्रवासही आशादायी ठरला आहे. २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याने भारताकडून पदार्पण करत पहिल्याच डावात ६२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ६८ धावांची खेळी साकारली. धरमशालामध्ये त्याने आणखी एक अर्धशतक झळकावले. त्यानंतर बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, मात्र तो सामना भारताला गमवावा लागला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघासोबत गेला, पण त्याला अंतिम संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली नाही आणि तो संघाबाहेरच राहिला.या सर्व अडथळ्यांनंतरही सरफराजची मानसिकता अझरुद्दीन यांना सर्वाधिक भावली आहे. “तो अजूनही शिकण्यास उत्सुक आहे. भारताकडून खेळून आणि धावा करूनही त्याला अधिक सुधारायचे आहे, ही अतिशय सकारात्मक बाब आहे. कोणीही परिपूर्ण नसतो. मी अडचणीत असताना झहीर अब्बास यांनी मला काय बदल करायचे आणि कसे, हे दाखवून दिले होते. वेगवान आणि स्विंग गोलंदाजी कशी खेळायची, हे त्यांनी मला शिकवले,” असे अझरुद्दीन यांनी सांगितले.
अझरुद्दीन यांनी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे थेट आवाहन करत सरफराजला आणखी एक संधी देण्याची मागणी केली. “तो भारताकडून पुन्हा खेळण्याच्या संधीस पात्र आहे. त्याने सर्वत्र धावा केल्या आहेत आणि भारताला आक्रमक फलंदाजांची गरज आहे. धावा करूनही जर संधी मिळत नसेल, तर ते खूप निराशाजनक ठरते. मात्र मला खात्री आहे की, त्याला लवकरच संधी मिळेल,” असे ते म्हणाले.