

sarfaraz khan fastest half century
मुंबई: विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खानची धमाकेदार खेळी पाहायला मिळत आहे. आज (दि. ८) पंजाबविरुद्धच्या सातव्या फेरीच्या सामन्यात त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माच्या एकाच षटकात सरफराजने ३ षटकार आणि ३ चौकार लगावत तब्बल ३० धावा वसूल केल्या.
नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सरफराज खानने मैदानात येताच फटकेबाजीला सुरुवात केली. डावातील १० व्या षटकात अभिषेक शर्मा गोलंदाजीला आला असता सरफराजने '६,४,६,४,६,४' असा धावांचा पाऊस पाडला. सरफराजने अवघ्या २० चेंडूंत ७ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ६२ धावांची झंझावाती खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट ३१० इतका होता. अखेर मयंक मार्कंडेने त्याला पायचीत बाद केले.
तत्पूर्वी, फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉर्मात असलेले सलामीवीर अभिषेक शर्मा (८) आणि प्रभसिमरन सिंह (११) स्वस्तात बाद झाले. मात्र, अनमोलप्रीत सिंह आणि रमणदीप सिंह यांच्या अर्धशतकी खेळींमुळे पंजाबला २१६ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबचा संपूर्ण संघ ५० षटकेही खेळू शकला नाही.
२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान यांनी मुंबईला ५० धावांची आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सरफराजने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. सरफराजच्या या तुफानी खेळीमुळे मुंबईने विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.