

हैदराबाद : भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सर्फराज खान सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. विजय हजारे करंडकातील नेत्रदीपक कामगिरीनंतर त्याचा 'गोल्डन फॉर्म' रणजी करंडकातही कायम आहे. हैदराबादविरुद्ध खेळताना सर्फराजने अवघ्या २०६ चेंडूंमध्ये झंझावाती द्विशतक झळकावून निवड समितीचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ५०० धावांचा टप्पा ओलांडला.
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सर्फराजने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने २१९ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार ठोकत २२७ धावांची खेळी साकारली. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १७ वे शतक आणि ६ वे द्विशतक ठरले. या सामन्यात त्याला तिहेरी शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, मात्र तो बाद झाला. विशेष म्हणजे, गेल्या ५० दिवसांत सर्फराजने देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
२ डिसेंबर २०२५ : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध ४७ चेंडूंत १०० धावा.
३१ डिसेंबर २०२५ : विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध ७५ चेंडूंत १५७ धावा.
२३ जानेवारी २०२६ : रणजी करंडकात हैदराबादविरुद्ध शानदार द्विशतक.
या द्विशतकी खेळीदरम्यान सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ६१ सामन्यांच्या ९१ डावांत ७०.१० च्या स्ट्राइक रेटने ५०९० धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी ६४ पेक्षा जास्त असून ती जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानली जाते. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आगामी कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्फराज खानने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र, त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. गेल्या एक वर्षापासून तो भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तो संघात सामील होता, परंतु त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नव्हती. आतापर्यंत खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांत त्याने ३७१ धावा केल्या आहेत.