

Sanjiv Goenka Emotional IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) विजयापेक्षा संघाचे मालक संजीव गोयंका यांचा भावनिक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर गोयंका यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले. साधारणपणे कठोर आणि स्पष्ट भूमिका घेणारे गोयंका यांचे हे वेगळे भावनिक रूप पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा पहिलाच विजय आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करल्यानंतर संघावर दबाव होता. त्यामुळे हैदराबादमध्ये मिळालेला हा विजय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. याच विजयाच्या आनंदात गोयंका भावूक झाल्याचे दिसून आले.
सामन्यादरम्यान गोयंका प्रार्थना करताना दिसले आणि शेवटच्या क्षणी सामना जिंकल्यानंतर त्यांच्या भावना अनावर झाल्या. ते डोळ्यातील अश्रू पुसताना दिसले. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यांच्या टीमप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे कौतुक केले.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, Lucknow Super Giants ने Sunrisers Hyderabad ला शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्सने पराभूत केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत हैदराबादला 20 षटकांत 156 धावांवर रोखले.
157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने सुरुवातीपासून संयमी खेळ केला. कर्णधार ऋषभ पंतने 68 धावांची दमदार खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले, तर एडेन मार्करामने 45 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेवटच्या क्षणी सामना जिंकत लखनऊने हंगामातील पहिला सामना खिशात घातला. या विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्सने 2 सामन्यांत 1 विजय आणि 1 पराभव अशी नोंद करत गुणतालिकेत 7वे स्थान मिळवले आहे.