

Arjun Tendulkar Engagement
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा नुकताच मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक हिच्याशी झाला. हा सोहळा एक खासगी स्वरुपाचा होता. यावेळी दोन्हींकडील जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. या वृत्ताबाबत तेंडुलकर अथवा घई यांनी भाष्य अथवा दुजोरा दिलेला नाही.
सानिया चांडोक ही अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. हे दोघे चांगले मित्र आहेत. सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदवी शिक्षण घेतले आहे. सानिया ही सारा तेंडुलकरचीदेखील मैत्रीण आहे. ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसून आणि ती प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते.
२५ वर्षीय अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये (IPL) तो मुंबई इंडियन्स संघाकडूनही (Mumbai Indians) खेळला आहे. त्याने २०२०-२१ च्या हंगामात मुंबईकडून खेळत त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात केली. हरियाणा विरुद्धच्या टी-२० सामन्यातून त्याने पदार्पण केले. त्यापूर्वी, त्याने ज्युनियर खेळाडू म्हणून मुंबईचेही प्रतिनिधित्व केले. त्याला भारताच्या १९ वर्षांखालील संघातही संधी मिळाली. त्याने २०२२-२३ च्या हंगामात गोव्यात प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
अर्जुनने १७ सामन्यात खेळत ५३२ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. त्याच्या नावावर ३७ विकेट्सही आहेत. त्याने गोव्यात लिस्ट ए क्रिकेटमध्ये १७ सामने खेळले. त्यातील ९ डावांमध्ये ७६ धावा केल्या. आयपीएलमधील पाच सामन्यांत तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यात त्याने ३८ च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या.
सानिया ही मुंबईतील सर्वात मोठ्या उद्योजक कुटुंबांतील आहे. ती उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंबाने हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत. रवी इक्बाल घई हे ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जो एका कुटुंबाची मालकी असलेला उद्योग समूह आहे. हॉस्पिटॅलिटी आणि आईस्क्रीम उद्योग क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे.
अधिकृत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडील नोंदीनुसार, सानिया चांडोक मुंबई येथील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये भागीदार आणि संचालक आहे. तिचा हा स्टार्टअप पाळीव प्राण्यांसाठी प्रीमियम स्किनकेअर आणि स्पा सेवा पुरवतो.