

मुंबई; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर सडकून टीका केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेत दोन सामने न खेळल्यामुळे अझरुद्दीन यांनी आपली नाराजी व्यक्त केली. एकदा संघात निवड झाल्यावर तुम्ही सामने निवडू शकत नाही, तुम्हाला देशासाठी खेळावेच लागेल, अशा शब्दांत त्यांनी बुमराहला सुनावले.
अझरुद्दीन म्हणाले, खेळाडूंवर जबाबदारी असते, ताण असतो; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सांभाळायलाच हवा. तुम्ही देशासाठी खेळत आहात. दुखापतीचा प्रश्न असेल, तर खेळाडू आणि ‘बीसीसीआय’ने मिळून निर्णय घ्यावा; पण ऐनवेळी माघार घेणे योग्य नाही. एखाद्या महत्त्वाच्या क्षणी संघाला बुमराहची नितांत गरज भासली असती, तर काय झाले असते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुमराहने फिटनेसच्या कारणामुळे मालिकेतून काही काळ विश्रांती घेतली होती, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दुसरीकडे, अझरुद्दीन यांनी हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव केला. सिराजच्या उत्कृष्ट फिटनेसचे श्रेय त्यांनी गमतीने त्याच्या आवडत्या ‘नल्ली गोश्त बिर्याणी’ आणि ‘पाया’ या पदार्थांना दिले. ते म्हणाले, सिराजने संपूर्ण मालिकेत प्रचंड ऊर्जा आणि उत्साह दाखवला. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याने पाचही कसोटी सामने खेळले आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात मोलाची भूमिका बजावली.
ओव्हल कसोटीत अखेरच्या चेंडूवर 143 कि.मी. प्रतितास वेगाने टाकलेला यॉर्कर त्याच्या फिटनेसची आणि ताकदीची साक्ष देतो. त्याने जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. सिराज हा भारतीय खेळातील नवा ‘सुपरस्टार’ आहे, अशा शब्दांत अझरुद्दीन यांनी त्याचे कौतुक केले.