

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे केवळ मैदानावरच नव्हे, तर क्रमवारीच्या आकड्यांमध्येही सिद्ध होत असते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानापासून दूर असला, तरी त्याचा दबदबा कायम आहे. ‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रोहितने एक अनपेक्षित झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या विश्चचषक अंतिम सामन्यानंतर एकही वन-डे सामना न खेळताही रोहितकडून ही उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.
रोहितच्या या बढतीमागे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमची निराशाजनक कामगिरी कारणीभूत ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत बाबरला धावा जमवता न आल्याने त्याचे रेटिंग गुण मोठ्या प्रमाणात घसरले आणि तो तिसर्या क्रमांकावर फेकला गेला. याचा थेट फायदा रोहित शर्माला मिळाला आणि तो दुसर्या स्थानी विराजमान झाला.
या नव्या क्रमवारीमुळे एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीय फलंदाजांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. युवा सलामीवीर शुभमन गिलने आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले असून, आता रोहित दुसर्या स्थानी आल्याने पहिल्या दोन क्रमांकांवर भारतीय फलंदाजांनी कब्जा केला आहे. त्याचबरोबर, ‘किंग’ विराट कोहली चौथ्या स्थानी, तर श्रेयस अय्यर आठव्या स्थानी स्थिर आहे. यामुळे अव्वल दहा फलंदाजांमध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे, जे संघाच्या फलंदाजीची ताकद दर्शवते.
एकीकडे क्रमवारीत रोहित आणि विराट आपले स्थान टिकवून असले, तरी दुसरीकडे त्यांच्या वन- डे भवितव्याविषयी चर्चा सुरू आहे. 2027 च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करून संघ व्यवस्थापन नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जाते. मात्र, ही ताजी क्रमवारी हेच सिद्ध करते की, अनुभवाला पर्याय नाही आणि 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये या दोन्ही दिग्गजांची क्षमता आजही अतुलनीय आहे.
आता भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौर्यावर तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित आणि विराट मैदानावर परततील तेव्हा त्यांच्या कामगिरीकडे आणि या क्रमवारीतील स्थानाकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेले असेल.