पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Final Rohit Sharma vs Virat Kohli : टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. यात केवळ दोन्ही संघ आमनेसामने येणार नाहीत, तर भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही विश्वविक्रमासाठी लढताना दिसणार आहेत. मात्र, दोघांचेही लक्ष्य आफ्रिकन संघाला कसे हरवायचे हेच असेल. दरम्यान या विजेतेपदाच्या सामन्यानंतर, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम कोणता खेळाडू करेल यावर शिक्कामोर्तब होईल.
सध्या टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पण रोहित शर्माही त्याच्यापासून दूर नाही. किंग कोहलीने टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये 1216 धावा केल्या आहेत, तर हिटमॅन रोहितच्या नावावर आतापर्यंत 1211 धावा जमा झाल्या आहेत. टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये केवळ हे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी 1200 हून अधिक धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा 2007 पासून प्रत्येक टी-20 विश्वचषकात भारताकडून खेळला आहे. तर विराट कोहली पहिल्या दोन स्पर्धांमध्ये खेळलेला नाही. तो 2012 च्या टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाचा भाग आहे. विराटने आतापर्यंत 34 सामने खेळले आहेत, तर रोहित शर्माने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 46 सामने खेळले आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट आणि रोहित यांच्यात केवळ 5 धावांचा फरक आहे. दरम्यान वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथील अंतिम सामन्यात फलंदाजी करताना विराट कोहली मोठी इनिंग खेळून आपले अव्वल स्थान राखणार की हिटमॅन आणखी एक झंझावाती इनिंग खेळून हा विक्रम उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल.