

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs SAW Test : द. आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात धावांचा डोंगर रचून विश्वविक्रम नोंदवला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 4 गडी गमावून 525 धावा करत 89 वर्षांचा विक्रम मोडीत काढला होता. दुसऱ्या दिवशी कर्णधार हरमनप्रीत कौरसह रिचा घोष यांनी अर्धशतकी खेळी करत आणखी एक विक्रम मोडला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय महिला संघाने कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक धावा केल्या.
दुस-या दिवशी 603 धावा करून महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील नवा विश्वविक्रम नोंदवला.
स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी केली.
शेफालीने सर्वात वेगवान द्विशतक झळकावले.
भारतीय संघ आता महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, जो अवघ्या 46 दिवसांत मोडला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने 15 फेब्रुवारी 2024 रोजी 575 धावा केल्या होत्या. पण टीम इंडियाने 6 गडी गमावून 603 धावा करत इतिहास रचला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकमेव कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. चेन्नई येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाच्या 5 फलंदाजांनी मिळून दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. 28 जून ते 2 जुलै दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 292 धावांची विक्रमी भागीदारी करत पाकिस्तानचा 20 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.
शेफालीने सर्वात वेगवान द्विशतक झळकावले. तिने 196 चेंडूत 23 चौकार आणि 8 षटकारांसह 205 धावा केल्या. तर मानधनाने 149 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 94 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तर रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनीही चमकदार कामगिरी केली. रिचाने 90 चेंडूंचा सामना करत 16 चौकारांच्या सहाय्याने 86 आणि हरमनप्रीतने 115 चेंडूत 69 धावा फटकावल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 गडी गमावून 525 धावा केल्या होत्या. यासह भारताने महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा 89 वर्ष जुना विक्रम मोडला. दुसऱ्या दिवशी, भारतीय संघाने 603 धावांवर डाव घोषित केला, जी महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
चेन्नई कसोटीपूर्वी भारतीय महिला संघाची एका डावात सर्वाधिक धावसंख्या 467 होती. 2002 मध्ये टाँटन येथे भारताने इंग्लंडविरुद्ध हा सामना जिंकला होता. टीम इंडियाने आता स्वत:चा विक्रम 22 वर्षांनंतर मोडला आहे. 603 धावा केल्यानंतर टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. विकेट संथ झाली आहे आणि भारताला येथून हरणे अशक्य बनले आहे.
या खेळीदरम्यान हरमनप्रीत आणि ऋचाने 5व्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही मोडला. दोघांमध्ये 143 धावांची भागीदारी झाली. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जोहमरी लॉगटेनबर्ग आणि चार्लीज यांच्या नावावर होता. या दोघांनी 7 ऑगस्ट 2023 रोजी इंग्लंडविरुद्ध 138 धावांची भागीदारी केली होती. पहिल्या डावात शेफाली वर्माने 205 धावा, स्मृती मानधनाने 149 धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने 55 धावा, हरमनप्रीत कौरने 69 धावा आणि ऋचा घोषने 86 धावा केल्या.
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवरील पुरुष आणि महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील ही चौथी सर्वोच्च खेळी आहे. भारतीय संघाने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 7 विकेट्सवर 759 धावांवर डाव घोषित केला होता.