

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका लवकरच सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल, परंतु त्याआधीच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयसीसीच्या क्रमवारीत मोठा झटका बसला आहे. इतकेच नाही, तर शुभमन गिलच्या पहिल्या क्रमांकाच्या स्थानावरही धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे, परंतु सध्या एकदिवसीय मालिकेबद्दल सर्वाधिक चर्चा आहे, कारण यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा सहभागी होणार आहेत. बुधवारी (दि. १५) आयसीसीने आपली नवीन क्रमवारी जाहीर केली, तेव्हा त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना क्रमवारीत नुकसान झाल्याचे दिसून आले.
यापूर्वी, भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता, परंतु आता तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तसेच, विराट कोहलीलाही एका स्थानाचे नुकसान झाले असून, तो आता पाचव्या क्रमांकावर गेला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने मोठी झेप घेतली असून, त्याने थेट दुसरे स्थान पटकावले आहे.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गिलचे सध्याचे रेटिंग ७८४ इतके आहे. आठ स्थानांची झेप घेऊन थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचलेल्या इब्राहिम जादरानचे रेटिंग आता ७६४ इतके झाले आहे. जादरानने केवळ रोहित आणि विराटलाच मागे टाकले नाही, तर तो शुभमन गिलच्याही खूप जवळ पोहोचला आहे. गिल आणि जादरानच्या रेटिंगमध्ये केवळ २० रेटिंगचा फरक आहे.
इब्राहिम जादरानच्या या प्रगतीमुळे केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच नाही, तर बाबर आझम, डेरिल मिचेल, चरित असलंका, हॅरी टेक्टर, श्रेयस अय्यर आणि शाई होप या फलंदाजांनाही नुकसान झाले आहे. हे सर्व फलंदाजांची एक-एक क्रमांकाने घसरण झाली आहे. इब्राहिम जादरानने मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात १११ चेंडूंवर ९५ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले होते. या कामगिरीचा फायदा त्याला ताज्या क्रमवारीत मिळाल्याचे दिसून येत आहे.