

ravindra jadeja equals sachin tendulkar and virender sehwag big record
टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा सुपडासाफ करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत धमाकेदार विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या कसोटीत त्याने फलंदाजी करताना दमदार शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीमध्येही निर्णायक भूमिका बजावली. त्याच्या या उत्कृष्ट योगदानामुळे, मालिका संपल्यानंतर त्याला 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा मायदेशात 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकला. या कामगिरीसह त्याने भारताचे दोन महान खेळाडू, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या दोन्ही दिग्गजांनीही आपल्या कसोटी कारकिर्दीत भारतीय भूमीवर प्रत्येकी तीन वेळा या पुरस्कारावर नाव कोरले होते.
मात्र, भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार जिंकण्याचा विक्रम फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण ९ वेळा हा मान मिळवला आहे.
'प्लेअर ऑफ द सीरीज' पुरस्कार मिळाल्यानंतर जडेजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, ‘‘जेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मला सांगितले तुला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे, तेव्हापासून मी एक 'योग्य फलंदाज' म्हणून विचार करत आहे आणि माझ्यासाठी ही गोष्ट प्रभावी ठरत आहे.’’
जडेजाने पुढे सांगितले की, ‘‘मी गेल्या अनेक वर्षांपासून आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो. त्यामुळे माझा दृष्टिकोन वेगळा होता. पण आता फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाल्यामुळे मला एका जबाबदार फलंदाजासारखे विचार करण्याची संधी मिळाली आहे. या बदलामुळे माझ्या खेळात अधिक सुधारणा झाली आहे.’’
दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने ५१८ धावा करून आपला डाव घोषित केला. जैस्वालने १७५ तर गिलने १२९ धावांची नाबाद खेळी केली.
त्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपला आणि भारताने त्यांना फॉलो-ऑन दिला. मात्र, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत ३९० धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना के.एल. राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि मालिका २-० ने जिंकत वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला.