

virat kohli rohit sharma odi
नवी दिल्ली : आयसीसीला एका गंभीर चुकीमुळे आपली एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी पुन्हा जाहीर करावी लागली. बुधवारी (दि. 21) यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे अनपेक्षितपणे गायब झाली होती. या गंभीर चुकीची दखल घेत आयसीसीने तातडीने उपाययोजना केल्या आणि आता सुधारित क्रमवारीसह एक निवेदनही प्रसिद्ध केले आहे.
आयसीसीने १९ ऑगस्टपर्यंत अद्ययावत केलेली नवी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यानुसार, भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल ७८४ रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर, रोहित शर्मा ७५६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी परतला आहे. एकेकाळी अव्वल स्थानी वर्चस्व गाजवणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आता ७३९ गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरला आहे. विराट कोहलीने ७३६ गुणांसह आपले चौथे स्थान पुन्हा मिळवले आहे.
बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या मूळ क्रमवारीत रोहित आणि विराट यांची नावे अव्वल १०० खेळाडूंमधूनही गायब झाली होती, तर बाबर आझमला दुसऱ्या स्थानी दाखवण्यात आले होते. रोहित आणि विराट दोघेही सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय असतानाही त्यांना क्रमवारीतून वगळल्याने क्रिकेटविश्वात मोठा गोंधळ उडाला होता. विशेषतः सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, ज्यानंतर आयसीसीने आपली चूक सुधारण्यासाठी पावले उचलली.
या गोंधळावर आयसीसीने निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. निवेदनात म्हलंय की, ‘या आठवड्यातील वनडे क्रमवारीतील काही त्रुटींची आम्ही चौकशी करत आहोत. झालेली चूक तात्काळ दुरुस्त करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान पुन्हा देण्यात आले आहे. या बदलाचा इतर कोणत्याही खेळाडूच्या क्रमवारीवर परिणाम झालेला नाही,’ असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही आयसीसीकडून सांघिक क्रमवारीत अशा चुका झाल्याचे दिसून आले आहे. आता पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या नव्या क्रमवारीनंतरच चित्र अधिक स्पष्ट होईल, ज्याची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.