

Shreyas Iyer to replace Rohit Sharma
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर याला स्थान मिळाले नाही. दरम्यान, बीसीसीआय मध्यल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे भारताच्या एकदिवसीय संघाचा पुढचा कर्णधार म्हणून जबाबदारी देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे. कारण सर्व फॉरमॅटमधील संभाव्य कर्णधार म्हणून शुभमन गिल एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेण्याची शक्यता कमी आहे.
आता वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार असावा, अशी चर्चा सुरु आहे. कसोटी संघात स्थान मिळू न शकलेल्या अय्यरला आशिया चषक स्पर्धेसाठी १५ खेळाडूंच्या संघात नक्कीच स्थान मिळेल, असे मानले जात होते. पण आशिया चषक स्पर्धेसाठीच्या टी-२० संघातून त्याला वगळण्यात आले.
टी-२० आशिया चषक स्पर्धा ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकतीच १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले. तर शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. दरम्यान, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुभमन गिल याच्याकडे आशिया चषक स्पर्धेसाठी टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवताना त्याला सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनवण्याचेही संकेत दिले.
आता बोर्ड आणि निवड समिती एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळ्या पर्यायावर विचार करत असल्याचे समजते. बीसीसीआय अय्यरच्या नावाचा एकदिवसीय संघाचा पुढचा कर्णधार म्हणून विचार करत आहे. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही, एका रिपोर्टनुसार, ५० षटकांच्या एक दिवसीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी, कदाचित २०२७ च्या विश्वचषकापर्यंत दीर्घकालीन पर्याय म्हणून अय्यर याचा विचार केला जाऊ शकतो.
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या टी-२० संघातील प्रबळ दावेदारांपैकी अय्यर हा एक होता. पण १५ सदस्यीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. तरीही, त्याच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळे, विशेषतः या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीने त्याची दावेदारी प्रबळ समजली जात आहे. अय्यरने भारताला विजेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने पाच सामन्यांत २४३ धावा कुटल्या. १५, ५६, ७९, ४५ आणि ४८ अशी त्याने सातत्यपूर्ण खेळी केली.
त्याने ७० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.२२ च्या सरासरीने २,८४५ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. यामुळे त्याने टीम इंडियाचा हुकमी एक्का समजले जाते. आता, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन त्याच्या नेतृत्व क्षमतेचा गांभीर्याने विचार करत आहे.
दरम्यान, अय्यरला देण्यात येणारी संधी ही रोहित शर्मा याच्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर निर्णयावर अवलंबून असेल. एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणारा हिटमॅन रोहित या वर्षी ३८ वर्षांचा झाला. रोहितसह विराट कोहली आधीच टी-२० आणि कसोटीतून निवृत्त झाले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांचा हा शेवटचा सहभाग असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.