आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत एक अनपेक्षित आणि धक्कादायक बदल समोर आला आहे. भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा, यांची नावे अचानक यादीतून गायब झाली आहेत. आयसीसीने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
जगभरातील क्रिकेट चाहते प्रत्येक आठवड्याला आयसीसीच्या क्रमवारीची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, अनेकदा आयसीसीकडून होणाऱ्या चुकांमुळे या क्रमवारीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. बुधवारी (दि. २०) जाहीर झालेल्या ताज्या यादीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील आठवड्यात अव्वल ५ मध्ये स्थान मिळवलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे यादीतून अचानक वगळण्यात आली आहेत, तेही कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय.
बुधवारी आयसीसीने आपली अद्ययावत एकदिवसीय क्रमवारी प्रसिद्ध केली. यामध्ये भारताचा शुभमन गिल अव्वल स्थानी कायम आहे, मात्र दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या बाबर आझमने झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत हे स्थान रोहित शर्माकडे होते. मागील आठवड्यात रोहित ७५६ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर विराट कोहली ७३६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. परंतु ताज्या क्रमवारीत या दोघांची नावे अव्वल १० सोडाच, पण अव्वल १०० खेळाडूंच्या यादीतही दिसत नाहीत. आयसीसीने यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यापूर्वीही अशा तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत.
आयसीसीच्या नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला क्रमवारीतून वगळण्याची प्रक्रिया निश्चित आहे. जेव्हा एखादा खेळाडू प्रदीर्घ काळासाठी विशिष्ट प्रकारच्या क्रिकेटपासून दूर असतो किंवा त्यातून निवृत्ती जाहीर करतो, तेव्हाच त्याचे नाव यादीतून काढले जाते. रोहित आणि विराटने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने, त्या क्रमवारीतून त्यांची नावे वगळणे स्वाभाविक आहे. मात्र, ते दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय असतानाही त्यांचे नाव वगळणे अनाकलनीय आहे.
रोहित आणि विराटने आपला अखेरचा एकदिवसीय सामना मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. याला केवळ पाच महिने उलटले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू ९ ते १२ महिने एकदिवसीय खेळला नाही, तर त्याला क्रमवारीतून वगळले जाऊ शकते. मात्र, रोहित आणि विराटच्या बाबतीत अद्याप इतका कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे लवकरच आयसीसीकडून या गोंधळावर स्पष्टीकरण दिले जाईल आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.