Rohit Sharma MI captain : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा 'हिटमॅन' राज! रोहित शर्मा कर्णधारपदी विराजमान, फ्रँचायझीची मोठी घोषणा

Rohit Sharma IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या नव्या पर्वाला आता रोहितच्या नेतृत्वाखाली सुरुवात
Rohit Sharma Returns as MI Captain
Published on: 
Updated on: 

मुंबई : आयपीएलच्या मैदानात पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माचा रुबाब पाहायला मिळणार आहे! मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल २०२७ हंगामासाठी त्याच्या नावावर कर्णधारपदाची अधिकृत मोहोर उमटवली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रोहित पुन्हा मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) फ्रँचायझीने अधिकृत घोषणा करत चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या नव्या पर्वाला आता रोहितच्या नेतृत्वाखाली सुरुवात होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२७ चा लिलाव येत्या १६ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे. या महत्त्वाच्या लिलावापूर्वीच पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने एक मोठी घोषणा करत आपल्या नव्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपल्या सर्वात यशस्वी कर्णधारावर विश्वास दर्शवला असून, आयपीएल २०२७ मध्ये संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती असणार आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रोहितचे कर्णधारपदी पुनरागमन होत आहे. यापूर्वी २०१३ ते २०२३ या कालावधीत त्याने ११ हंगाम मुंबईचे नेतृत्व केले आणि संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवले. आता फ्रँचायझीने पुन्हा एकदा त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma Returns as MI Captain
Rohit Sharma record as MI captain : ५ IPL ट्रॉफी, ८७ विजय अन् धोनीशी बरोबरी! रोहित शर्माच्या नेतृत्वाचा ‘असा’ आहे विक्रमी प्रवास

हार्दिक पंड्याची जागा घेणार रोहित

२०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली होती, तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र, हा बदल फ्रँचायझीच्या अपेक्षेनुसार यशस्वी ठरला नाही. मागील तीन हंगामांत मुंबईच्या संघाला केवळ एकदाच प्लेऑफपर्यंत मजल मारता आली. मैदानावरील निराशाजनक कामगिरीबरोबरच संघाला काही वादांचाही सामना करावा लागला, ज्यामुळे व्यवस्थापनाची नाराजी वाढत गेली.

Rohit Sharma Returns as MI Captain
Yashasvi Jaiswal Creates History: एकही चेंडू न खेळता यशस्वी जयस्वालने रचला इतिहास... सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्ससोबत झालेल्या 'ट्रेड' करारांतर्गत हार्दिकला पंजाबकडे सोपवण्यात आले असून, त्याबदल्यात मुंबईने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. हार्दिकच्या जाण्यानंतर संघासमोर नवा कर्णधार निवडण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत, कोणत्याही नव्या चेहऱ्यावर डाव लावण्याऐवजी फ्रँचायझीने आपला जुना आणि सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडेच पुन्हा मोर्चा वळवला.

सूर्यकुमार आणि तिलक वर्माही होते शर्यतीत

मुंबई इंडियन्सकडे कर्णधारपदासाठी अनेक सक्षम पर्याय उपलब्ध होते. या शर्यतीत सूर्यकुमार यादवचे नाव आघाडीवर मानले जात होते. त्यासोबतच युवा फलंदाज तिलक वर्माही संभाव्य दावेदारांमध्ये होता. नुकतीच त्याची 'भारत अ' संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने त्याच्या नेतृत्वगुणांची जोरदार चर्चा सुरू होती. असे असतानाही, मुंबई व्यवस्थापनाने रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपद स्वीकारण्यासाठी राजी करण्यात यश मिळवले.

Rohit Sharma Returns as MI Captain
AUS vs ENG T20 : गाबावर ऑस्ट्रेलियाची दाणादाण! इंग्लंडने १०८ धावांत गुंडाळला कांगारूंचा संघ; ओव्हरटनची भेदक गोलंदाजी

विशेष म्हणजे, आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक फळीतही मोठा बदल पाहायला मिळणार आहे. माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून पोलार्ड ही अनुभवी जोडी पुन्हा एकदा मुंबईला जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.

धोनीनंतर सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत १५८ आयपीएल सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने ८७ सामन्यांत विजय मिळवला असून, ६७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला, तर ४ सामने अनिर्णित (टाय) राहिले आहेत. या यादीत रोहितच्या पुढे केवळ महेंद्रसिंग धोनी आहे. नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या धोनीने २३५ सामन्यांत चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व केले होते.

नीता अंबानींकडून 'हिटमॅन'चे खास स्वागत!

रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनातही आनंदाचे वातावरण आहे. फ्रँचायझीच्या मालकीण नीता अंबानी यांनी रोहितचे स्वागत करताना त्याच्या प्रवासाचे कौतुक केले. २०११ मध्ये रोहितला संघात घेण्यासाठी बोली लावली, तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

एका युवा खेळाडूपासून ते महान फलंदाज आणि पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार असा रोहितचा प्रवास पाहणे आनंददायी असल्याचे त्यांनी म्हटले. आकाश अंबानी यांनीही रोहितचे मुंबई इंडियन्स आणि चाहत्यांशी असलेले नाते विशेष असल्याचे सांगत त्याच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त केला.

रोहित म्हणाला, मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग!

पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने रोहित शर्मानेही आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्स हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत या संघाचे नेतृत्व करणे ही नेहमीच अभिमानाची बाब असल्याचे त्याने म्हटले.

नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यासोबत आगामी हंगामाबाबत झालेली चर्चा उत्साहवर्धक होती. संपूर्ण संघ एकजुटीने खेळेल आणि चाहत्यांना जल्लोष करण्याच्या अनेक संधी मिळवून देईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. नैसर्गिक शैलीत क्रिकेट खेळणे, संघभावनेला प्राधान्य देणे आणि मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे रोहितने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.