

rohit sharma shivaji park practice session
मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्याच्या तयारीला लागला आहे. शुक्रवारी त्याने मुंबईतील शिवाजी पार्क येथे माजी मुंबई सहकारी अभिषेक नायर यांच्यासोबत तब्बल दोन तास कडक सराव केला.
अलीकडेच शुभमन गिलला वन-डे संघाचे नेतृत्व देण्यात आल्यानंतरही रोहित नव्या मालिकेसाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे.
सरावादरम्यान रोहितने ‘ऑल हार्ट क्रिकेट अकादमी’मध्ये दोन नेट सत्र घेतले. त्यावेळी मुंबईचा युवा खेळाडू रघुवंशी आणि इतर काही स्थानिक क्रिकेटर सरावाला उपस्थित होते. रोहितची ही तयारी आगामी मालिकेसाठी त्याच्या गंभीर भूमिकेची चाहत्यांना जाणीव करून देणारी ठरली आहे.
मुंबई रणजी संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलू शार्दूल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. तर सर्फराज खान आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेशही मुंबईच्या 16 सदस्यीय संघात करण्यात आला आहे. मुंबईचा संघ रणजी करंडक 2025-26 हंगामात पहिला सामना 15 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या शेर-इ-कश्मीर स्टेडियममध्ये जम्मू आणि काश्मीर विरुद्ध खेळणार आहे.
मुंबईचा संघ गेल्या रणजी करंडक स्पर्धेत जम्मू आणि काश्मीर संघाकडून पराभूत झाला होता. एलिट ग्रुप डी मध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड आणि पॉण्डिचेरी संघांचा समावेश आहे. मुंबई संघात यावेळी अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडियाच्या टी-20 संघातील शिवम दुबे, मागील हंगामातील अपघातानंतर संघाबाहेर गेलेला मुशीर खान यांना पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केलेल्या आयुष म्हात्रेलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
मुंबई रणजी संघ असा : शार्दूल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तमोरे (यष्टिरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुश कोटियन, तुषार देशपांडे, सिल्व्हेस्टर डिसुझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रोयस्टन डायस.