

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने दिल्लीच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना, भारतीय फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा परफेक्ट बॅलन्स साधत दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन गडी गमावून 318 धावा जमवल्या. या शानदार कामगिरीचा शिल्पकार ठरला तो युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल. त्याने आपल्या कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक झळकावून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताची सलामी जोडी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी नव्या चेंडूवर संयमी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या तासात कोणतीही विकेट पडू दिली नाही. या जोडीने अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. मात्र, फिरकीपटू वॉरिकन येताच त्याने पहिल्याच षटकात भारताला धक्का दिला. त्याने केएल राहुलला (38 धावा) जाळ्यात अडकवून स्टंपिंगद्वारे तंबूत पाठवले.
राहुल बाद झाल्यानंतर साई सुदर्शन मैदानात उतरला. त्याने जैस्वालसोबत मिळून वेस्ट इंडिजच्या आशा धुळीस मिळवल्या. या डावखु-या जोडीने तिस-या सत्रापर्यंत विंडिज गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांच्या चौफेर फटकेबजीने संघाचा धावफलकही हलता राहिला.
पहिल्या सत्रात सावध खेळणाऱ्या यशस्वीने लंचनंतर आपला गियर बदलला. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत धडाकेबाज सातवे कसोटी शतक पूर्ण केले.
साई सुदर्शननेही त्याला उत्तम साथ दिली. त्याने काही उत्कृष्ट फटके मारत आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. 58 धावांवर असताना ग्रीव्हसने एक संधी निर्माण केली होती, पण वॉरिकनने झेल सोडला. दुस-या सत्रापर्यंत भारताने 1 विकेट गमावून 200 धावसंख्येचा आकडा पार केला होता. त्यानंतर तिस-या आणि अंतिम सत्रात वेस्ट इंडिजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे धावगती थोडी मंदावली. वॉरिकनने अखेर आपल्या फिरकीच्या जादूने साई सुदर्शनला 87 धावांवर पायचीत करत ही मोठी भागीदारी तोडली. सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार शुभमन गिल मैदानावर आला आणि त्याने अत्यंत संयम आणि ठोस बचावात्मक तंत्र दाखवले. त्याने खैरी पिएरविरुद्ध दोनवेळा स्लॉग स्वीप मारला, पण एकूणच त्याचा दृष्टिकोन सावध होता.
दुसऱ्या बाजूला, जैस्वालची धावांची भूक अजूनही कायम आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा 150 धावांचा टप्पा पार केला.
वॉरिकनने राहुलला आणि सुदर्शनला फिरकीच्या जाळ्यात अडकव असले तरी, या दोन चेंडूंव्यतिरिक्त फिरकी गोलंदाजीला सामोरे जाणे भारतीय फलंदाजांना फारसे कठीण गेले नाही. वेस्ट इंडिजने धावगतीवर नियंत्रण ठेवले असले तरी, फलंदाजांवर सातत्याने दबाव आणण्यात ते अपयशी ठरले. टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे आणि ते आता मोठी धावसंख्या करण्याच्या निर्धाराने दुसऱ्या दिवशी मैदानात उतरतील. दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघ पुनरागमन करतो की भारतीय फलंदाज त्यांचे वर्चस्व कायम राखतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.