

yashasvi jaiswal 7 grounds 7 centuries his dominance in tests cricket
युवा खेळाडूंमध्ये क्वचितच आढळणारी शांत दृढता यशस्वी जैस्वालमध्ये ठासून भरलेली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी हा भारतीय सलामीवीर प्रत्येक नवीन मैदानास आपले व्यासपीठ बनवत आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले. ही केवळ धावांची नोंद नाही, तर 7 वेगवेगळ्या मैदानांवर 7 कसोटी शतकांचा विक्रम होता. हा आकडा केवळ त्याची सातत्यपूर्ण कामगिरी नव्हे, तर त्याची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवतो. आणि हीच कोणत्याही जागतिक दर्जाच्या फलंदाजाची खरी ओळख असते.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, भारताने दोन गडी गमावून ३१८ धावा केल्या. यशस्वी १७३ धावांवर आणि शुभमन गिल २० धावांवर नाबाद आहेत. साई सुदर्शन ८७ आणि केएल राहुल ३८ धावा करून बाद झाले.
या प्रवासाची सुरुवात २०२३ मध्ये रोसियो, डोमिनिका येथे झाली. आपल्या पहिल्याच कसोटीत, वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वीने १७१ धावांची शानदार खेळी केली होती. सुमारे आठ तास फलंदाजी करताना, त्याने केवळ आपल्यातील प्रतिभाच नव्हे, तर धैर्य आणि अभिजात कसोटी क्रिकेटचे प्रदर्शन केले.
यानंतर, इंग्लंडमधील लीड्स आणि द ओव्हल येथे चेंडू स्विंग आणि बाऊन्स दोन्ही होतो अशा मैदानांवर त्याने परदेशी परिस्थितीतही टिकाव धरण्याची क्षमता दाखवून दिली. तेथे त्याने संयम आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट समतोल राखत धावा जमा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर आणि आता दिल्लीत, जैस्वालने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो तांत्रिकदृष्ट्या सशक्त आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आहे.
यशस्वी जैस्वालचे वैशिष्ट्य हे आहे की त्याची शतके केवळ सोप्या किंवा सपाट खेळपट्ट्यांवर आलेली नाहीत. दिल्ली कसोटीत त्याने १४५ चेंडूंमध्ये १६ चौकार लगावत आपले सातवे शतक पूर्ण केले. त्याच्या फलंदाजीमध्ये पारंपरिक कव्हर ड्राइव्ह्स सोबतच आक्रमक कट शॉट्सचे मिश्रण पाहायला मिळाले.
अनेक तज्ञांच्या मते, जैस्वालची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची सुस्पष्ट विचारसरणी. त्याला कधी डाव उभारायचा, कधी नियंत्रण ठेवायचे आणि कधी आक्रमण करायचे, हे नेमके ठाऊक असते. अहमदाबाद कसोटीत ३६ धावांवर बाद झाल्यानंतर त्याने सलग दोन दिवस नेटमध्ये केलेल्या कठोर परिश्रमातून हे स्पष्ट झाले. दिल्ली कसोटीपूर्वीची त्याची तयारी दर्शवते की तो प्रत्येक अपयशाचे रूपांतर शिकण्यात करण्याची क्षमता ठेवतो.
यशस्वी जैस्वालच्या प्रत्येक शतकाने भारतासाठी सामन्याची बदलली आहे. रोसियोमधील पदार्पण शतकाने भारताला मोठा विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धची शतके कठीण परिस्थितीत संघासाठी स्थिरता घेऊन आली. आणि आता दिल्लीचे शतक, ज्यामुळे पहिल्याच दिवशी भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले.
जैस्वालची खेळी नेहमीच भारताच्या डावाचा पाया रचते आणि मधल्या फळीवरील दबाव कमी करते. अवघ्या दोन वर्षांत ५० च्या सरासरीसह सात शतके आणि १२ अर्धशतके ही कोणत्याही युवा फलंदाजासाठी विलक्षण कामगिरी आहे. कॅरिबियन बेटे असोत, इंग्लंडची थंडी असो किंवा भारताच्या कोरड्या खेळपट्ट्या, जैस्वालने प्रत्येक ठिकाणी आपल्या खेळात फेरबदल केले आहेत. त्याच्या प्रत्येक फटक्यात आत्मविश्वास, प्रत्येक धावेत परिपक्वता आहे.