

CB vs GT Head-to-Head: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज IPL 2026 च्या क्वालिफायर-1 मध्ये मोठी लढत रंगणार आहे. धर्मशालामधील HPCA स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
या हंगामात लीग स्टेजमध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. विशेष म्हणजे दोन्ही वेळा घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाने विजय मिळवला. त्यामुळे आजचा सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
IPL इतिहासात RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 8 सामने झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. म्हणजेच आकडेवारीनुसार दोन्ही संघ एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसतात.
एकूण सामने: 8
GT विजय: 4
RCB विजय: 4
यामुळे क्वालिफायर-1 मध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दोन संघांमधील सामन्यांमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 8 डावांत तब्बल 460 धावा केल्या असून त्याची सरासरी 76.66 आहे. त्याचा स्ट्राइक रेट 152.31 इतका राहिला आहे.
त्याच्यानंतर गुजरातचा स्टार फलंदाज साई सुदर्शन याने 6 डावांत 265 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने 243 धावा केल्या आहेत.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
विराट कोहली – 460 धावा
साई सुदर्शन – 265 धावा
शुभमन गिल – 243 धावा
गोलंदाजीत गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अव्वल आहे. त्याने RCB विरुद्धच्या सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर रशीद खानने 8 विकेट्स घेतल्या आहेत. RCB चा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 5 विकेट्स मिळवल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
मोहम्मद सिराज – 10 विकेट्स
राशिद खान – 8 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 5 विकेट्स
अरशद खान – 4 विकेट्स
जॉश हेझलवूड – 4 विकेट्स
धर्मशालाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने आजच्या सामन्यात सिराज, हेजलवूड आणि राशिद खान यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. दुसरीकडे विराट कोहली, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यावर संघाच्या फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.