RCB vs GT | आरसीबी-गुजरात महासंग्राम आज! कोण गाठणार थेट फायनल?

दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावणार
RCB vs GT  |
RCB vs GT | आरसीबी-गुजरात महासंग्राम आज! कोण गाठणार थेट फायनल?
Published on
Updated on

धर्मशाळा; वृत्तसंस्था : ‘आयपीएल’च्या जेतेपदाकडे कूच करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) हे दोन्ही तगडे संघ आज (दि. 26) पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. धर्मशाळेच्या ऐतिहासिक मैदानावर यंदाच्या लीगचे थेट फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी उभय संघांत जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. या हंगामात धर्मशाळेतील सामने पाहता हे मैदान आता पूर्णपणे हाय-स्कोअरिंग बनले आहे. मात्र, फलंदाजांचे वर्चस्व वाढले असले, तरी वेगवान गोलंदाजांनाही येथे उत्तम सूर सापडत असल्याने जुगलबंदी रंगत राहणार आहे.

खेळपट्टीचे हेच दुहेरी स्वरूप आजच्या महामुकाबल्याचा निकाल ठरणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या हंगामात खेळवल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांत पहिल्या डावातील धावसंख्या 200 किंवा त्यापार गेली आहे. धर्मशाळेच्या खेळपट्टीवर अजूनही सीम मुव्हमेंट आणि उसळी पाहायला मिळत असली, तरी हे मैदान केवळ गोलंदाजांसाठीच पोषक आहे, हा जुना समज आता मागे पडला आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगला येत असल्याने, सुरुवातीची षटके खेळून काढल्यानंतर फलंदाज येथे धावांचा पाऊस पाडू शकतात.

समुद्रसपाटीपासून साधारण 1,450 मीटर उंचीवर असलेल्या येथील मैदानावर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून उत्कृष्ट उसळी आणि पारंपरिक स्विंग मिळतो. विशेषतः, नवीन चेंडूने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे येथे अधिक प्रभावी ठरते. वेगवान गोलंदाजांना मदत मिळूनही येथील धावसंख्या कमी होत नाही. याचे कारण म्हणजे येथील आऊटफील्ड अत्यंत वेगवान आहे. सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये विकेटस् पडल्यानंतर चेंडू मऊ झाला की, फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उठवतात, हाच ट्रेंड चालू हंगामातील तिन्ही सामन्यांत दिसला आहे.

सध्याच्या परिस्थितीनुसार, आजच्या सामन्यात ‘आरसीबी’चे पारडे थोडे जड दिसते आहे. मात्र, गुजरात मुसंडी मारणार का, याचेही येथे औत्सुक्य असेल. गुजरात टायटन्सकडे अतिवेगवान गोलंदाज असले, तरी धर्मशाळेत फिरकीपटूंना मिळणारी मर्यादित मदत त्यांच्यासाठी चिंतेची ठरू शकते. अलीकडे येथे वेगवान गोलंदाजांनीच सर्वाधिक विकेटस् घेतले असल्याचा इतिहास पाहता राशीद खानसाठी येथील खेळपट्टी कसोटी पाहणारी का, हे देखील लक्षवेधी ठरू शकते.

पॉवर प्लेची 6 षटके ठरणार महत्त्वाची!

आजच्या पहिल्या क्वालिफायरमधील खरा थरार पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये पाहायला मिळेल. दोहोंपैकी जो संघ ही 6 षटके गाजवेल, त्याचा फायनलचा रस्ता सुकर होईल, असा यापूर्वीचा इतिहास सांगतो.

‘टॉस’ ठरणार बॉस?

या मैदानावर नाणेफेक (टॉस) जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला पसंती देईल. चालू हंगामात पाठलाग करणार्‍या संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. याचे कारण म्हणजे फ्लडलाईटस्खाली चेंडूची चकाकी कमी झाल्यावर आणि दव पडल्यावर फलंदाजी करणे सोपे होते. त्यामुळे आज रात्री होणार्‍या या सामन्यात टॉसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news