

RCB IPL Final History Virat Kohli
आयपीएल इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि भावनिक संघांपैकी एक असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) पुन्हा एकदा जेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे. 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही या संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली. आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक पिढी बदलली आहे, परंतु आरसीबी संघाला अद्यापही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही.
यंदाच्या हंगामात आरसीबीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी स्पर्धेत अनेक विक्रम केले आहेत. 18 वर्षांच्या आयपीएल इतिहासात घराबाहेरचे (अवे सामने) सर्व सामने जिंकणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. तसेच त्यांनी क्वालीफायर 1 मध्येही पंजाब किंग्जचा त्यांच्या होम ग्राउंडवर दारुण पराभव केला. यासह त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. ज्यामुळे चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. यावेळी संघ नवीन कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. आता ते फायनलमध्ये कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरसीबीची ओळख महत्त्वाच्या क्षणी, विशेषतः मोठ्या सामन्यांमध्ये किंवा अंतिम सामन्यात विजयाच्या अगदी जवळ येऊनही हरणारा संघ अर्थात चोकर्स अशी आहे. इतिहासाची पाने आरसीबीला आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पराभवाची आठवण करून देत आहेत. कर्णधार पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी यावेळी अंतिम सामन्यात ‘चोकर’चा शिक्का पुसून टाकू शकेल का? की ही अंतिम फेरी मागील अंतिम सामन्यांसारखीच असेल, हा पाहण्याचा विषय असेल. आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर हा संघ चोकर बनतो. संघाचे खराब रेकॉर्ड याचा पुरावा आहे.
2008 मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद राजस्थान रॉयल्सने जिंकले. त्यांनी फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दुसरीकडे, आरसीबीला 2009 मध्ये पहिला आयपीएल अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली. 24 मे 2009 रोजी, आरसीबी विरुद्ध डेक्कन चार्जर्स हैदराबाद यांच्यात जोहान्सबर्ग येथे अंतिम सामना खेळला गेला. जिथे अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 20 षटकांत केवळ 6 बाद 143 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, आरसीबीने खराब खेळ केला. त्यांच्या विकेट सतत पडत राहिल्या. आरसीबीसाठी 143 धावांचा पाठलाग बऱ्याच प्रमाणात शक्य होता, परंतु हा संघ अंतिम सामन्याचा दबाव सहन करू शकला नाही. अखेर त्यांना 9 विकेटच्या मोबदल्यात फक्त 137 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि विजेतेपदाचा सामना 6 धावांनी गमावला. त्या सामन्यात कोहलीने 7 धावा केल्या होत्या. आरसीबी कर्णधार अनिल कुंबळेने 16 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.
2011 मध्ये आरसीबी संघाला दुसरा आयपीएल फायनल खेळण्याची संधी मिळाली. हा सामना 28 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. जिथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ मुरली विजयच्या 95 धावांच्या जोरावर 5 बाद 205 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, डॅनियल व्हिटोरीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीला फक्त 8 बाद 147 धावा करता आल्या. त्या सामन्यात विराट कोहलीने 35 धावा केल्या. आरसीबीचा सौरभ तिवारी 42 धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
आयपीएल 2016 चा हा हंगाम विराट कोहलीसाठी खूप चांगला होता, कारण या हंगामात त्याने 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने आणि 152.03 च्या स्ट्राईक रेटने 973 धावा केल्या. एका हंगामातील खेळाडूची ही आजपर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 2016 च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट कोहली आरसीबीचे नेतृत्व करत होता आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा सामना करत होता.
हा सामना 29 मे 2016 रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. जिथे डेव्हिड वॉर्नरच्या 69 धावांच्या जोरावर एसआरएचने 7 विकेट गमावून 208 धावा केल्या. त्यानंतर या सामन्याच्या धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने 10.3 षटकांत 114 धावा जोडल्या, येथून आरसीबीचा विजय निश्चित दिसत होता. पण या धावसंख्येवर सलामीवीर ख्रिस गेलची (76) विकेट पडली. त्यानंतर कोहली (54) देखील संघाची धावसंख्या 140 असताना बाद झाला. हे दोन्ही खेळाडूंना बाद झाल्यानंतर संपूर्ण आरसीबी संघ कोसळला आणि सामना अवघ्या 8 धावांनी गमावला.
म्हणजेच, एक गोष्ट स्पष्ट आहे की आरसीबी संघ तीन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, परंतु त्यांना स्वप्नपूर्तीने थोडक्यात हुलकावणी दिली आहे. आता हा ‘चोकर्स’चा शिक्का पुसून टाकण्यात यशस्वी होईल का हे पाहणे मनोरंजक असेल.