

IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्ज (PBKS)ची फलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त केली. मुल्लांपूरच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी कहर केला आणि पंजाबला अवघ्या 101 धावांत ऑलआऊट केले. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.
RCB चा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय RCB साठी महत्त्वाचा ठरला. मुल्लांपूरच्या खेळपट्टीवर दव आणि संध्याकाळच्या परिस्थितीचा फायदा घेत RCB च्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. सुयश शर्मा, जॉश हॅझलवूड, आणि यश दयाल यांनी पंजाबच्या फलंदाजीच्या मुळावर घाव घातला, तर रोमारिओ शेफर्ड आणि भुवनेश्वर कुमार यांनी त्यांना शेवटचा दणका दिला.
पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सुरुवात केली. प्रियांशने 5 चेंडूत 7 धावा केल्या, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश होता, परंतु यश दयालच्या गोलंदाजीवर तो कृणाल पंड्याकडे झेलबाद झाला. प्रभसिमरनने 10 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 18 धावा केल्या. त्याचा अडसर भुवनेश्वर कुमारने दूर केला. जितेश शर्माने विकेटच्या मागे त्याचा झेल पकडला. पॉवरप्लेमधील कमकुवत सुरुवातीनंतर जोश इंग्लिस आणि श्रेयस अय्यर क्रीजवर होते, परंतु दोघेही लवकर बाद झाले. इंग्लिसने 7 चेंडूत 4 धावा केल्या आणि भुवनेश्वरच्या चेंडूवर हेझलवूडकडे झेल दिला. अय्यरने 3 चेंडूत 2 धावा केल्या. जितेश शर्माने हेझलवूडच्या चेंडूवर त्याचा झेल घेतला.
पंजाबचा संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी षटके खेळणारा संघ बनला आहे. यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वात कमी षटके (16.1) खेळली होती.
गुरुवारी पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकांत फक्त 101 धावा करू शकला, जी आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील चौथी सर्वात कमी धावसंख्या आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम डेक्कन चार्जर्सच्या नावावर आहे. त्यांनी 2010 मध्ये बंगळुरूविरुद्ध 82 धावा केल्या होत्या. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स संघ) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी राजस्थानविरुद्ध 87 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये लखनौचा संघ एलिमिनेटरमध्ये मुंबईविरुद्ध फक्त 101 धावा करू शकला होता.
82 : डेक्कन चार्जर्स विरुद्ध आरसीबी, डीवाय पाटील, 2010 (तिसरे स्थान प्लेऑफ)
87 : डीसी विरुद्ध आरआर, मुंबई डब्ल्यूएस, 2008
101 : एलएसजी विरुद्ध एमआय, चेन्नई, 2023 एलिमिनेटर
101 : पीबीकेएस विरुद्ध आरसीबी, मुल्लानपूर, क्वालिफायर 1
104 : डेक्कन चार्जर्स विरुद्ध सीएसके, डीवाय पाटील, 2010